ताजे अपडेट
Trending

सांगोला आगारप्रमुखाच्या हकालपट्टीसाठी प्रवाशी संतप्त

प्रजासत्ताकदिनी होणार उग्र आंदोलन

Spread the love

प्रवाशांना होणाऱ्या या त्रासाचे आगार व्यवस्थापकाला काही देणे घेणे नाही. नेतेही हवेत उडत आहेत. आलिशान फॉर्चुनर गाडीतून उतरून या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर काम करण्यास त्यांना वेळ नाही. सांगोला तालुक्याचे हे खूप मोठे दुर्दैव आहे. निवडणुका संपल्या असल्याने जनतेला कोलण्याचा हा प्रकार आहे.

सांगोला / नाना हालंगडे
एसटीच्या ब्रीदवाक्याला हरताळ फासणाऱ्या अकार्यक्षम आगारप्रमुखामुळे सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागात एसटीची रोजच बोंबाबोंब होत आहे. प्रसार माध्यमातील बातम्या आणि नेत्यांनाही फाट्यावर मारणाऱ्या बेमुर्वत अधिकाऱ्याची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी आता प्रवाशी वज्रमूठ आवळू लागले आहेत. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.

एसटी बस ही ग्रामीण भागासाठी जीवनवाहिनी आहे. हजारो लोक एसटी बसमधून प्रवास करत असतात. त्यातून एसटी महामंडळाला लाखो रुपयांचा महसूल गोळा होत असतो. त्याच उत्पन्नातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगार केला जातो. त्याद्वारे प्रवाशांना चांगली सेवा मिळावी, त्यांचा प्रवास सुखकर व्हावा असे अपेक्षित असते. मात्र तसे होताना दिसत नाही.

गाड्या उशिराने सोडल्या जातात. याबाबत नियंत्रण कक्षातून माहिती दिली जात नाही. जर गाड्या उशिराने दिल्या तर मुक्कामी जातील की नाही याची शाश्वती नाही.

एसटी महामंडळाचा सांगोला आगार याबाबतीत अपवाद ठरत आहे. या आगारातून सुटणाऱ्या गाड्यांची अवस्था दयनीय आहे. वेळापत्रकाची दाणादाण उडाली आहे. गाड्यांमध्ये अग्निशमन यंत्रणा नाही. प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.

प्रवाशांना होणाऱ्या या त्रासाचे आगार व्यवस्थापकाला काही देणे घेणे नाही. नेतेही हवेत उडत आहेत. आलिशान फॉर्चुनर गाडीतून उतरून या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर काम करण्यास त्यांना वेळ नाही. सांगोला तालुक्याचे हे खूप मोठे दुर्दैव आहे. निवडणुका संपल्या असल्याने जनतेला कोलण्याचा हा प्रकार आहे.

हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता प्रवाशी वज्रमूठ आवळू लागले आहेत. याबाबत माहिती देताना एसटीचे नियमित प्रवाशी आणि सजग नागरिक उत्तम गेंड म्हणाले की, तालुक्यातील ग्रामीण एसटीच्या सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे तालुकावासियांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत मी आगारप्रमुख विकास पोफळे यांना बऱ्याच वेळा बोललो. पण काहीच सुधारणा होताना दिसत नाहीत. उलट त्यात वाढच झाली आहे.

विभाग नियंत्रक सोलापूर यांचा वरदहस्त असल्याने कोणालाच जुमानत नाही. हा अधिकारी आमच्या तालुक्यात नोकर आहे. पण याचा साहेबी थाट न्याराच आहे. केलेल्या कोणत्याच तक्रारीची दखल घेतली जात नाही. यांना आपल्या अधिकार कर्तव्याची जाण नाही. शालेय मुले, महिलावर्ग तसेच अबालवृद्ध यांना मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागत आहे.

त्रास नित्याचाच
आज ग्रामीण भागातील एकही एसटी वेळेवर धावत नाही. ज्या गाड्या सर्वाधिक उत्पन्न देतात त्यांनाही यांनीच खोडा घातला आहे. गेली पाच दिवसापासून घेरडी मार्गावरील एकही गाडी वेळेवर सोडली गेली नाही. सोमवारी सायंकाळी साडे पाचची जत आणि नराळे मुक्कामी गाड्या दोन्ही संगेच सोडल्या. मग कसे उत्पन्न मिळेल. उलट यामुळे आम्हाला त्रास सोसावा लागत आहे.

गाड्या उशिराने सोडल्या जातात. याबाबत नियंत्रण कक्षातून माहिती दिली जात नाही. जर गाड्या उशिराने दिल्या तर मुक्कामी जातील की नाही याची शाश्वती नाही. यामध्ये सुधारणा झाली नाही तर येत्या 26 तारखेला आंदोलन करण्यात येणार आहे.

रासप स्टाईलने जाब विचारणार : मोटे
आगारप्रमुख कोणाच्या तरी वरदहस्ताने काम करीत आहे. असंख्य तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. याच अकार्यक्षम आगार प्रमुखाला रासप स्टाईलने जाब विचारणार असून तालुकावासियांना होणार त्रास इथून पुढे सहन करणार नाही, असा इशारा सोमाआबा मोटे (जिल्हा नियोजन समिती सदस्य, सोलापूर) यांनी दिला आहे.

मुली देणार साडी चोळी
आज केवळ आमच्या गावाकडील गाड्या अजूनही वेळेवर सोडल्या जात नाहीत. याच आगार प्रमुखाला कोणी आई, बहीण, बायको नाही का? गेली चार ते पाच महिन्यांपासून आम्ही हा त्रास सोसत आहोत. वारंवार तक्रार केली पण हा अधिकारी बेजबाबदारपणेच वागतो. याबाबत कोणीच लोकप्रतिनिधी दखल घेत नाहीत. त्यामुळे याला आम्ही सर्व मुली साडी,चोळी अन् बांगड्या भरून लोकशाही मार्गाने सन्मान करणार आहोत. भले याने आमच्या मार्गावरील सेवा बंद केली तरी चालेल, असा इशारा महिला प्रवासी राणी चव्हाण यांनी दिला आहे.


सांगोला तालुक्यातील विविध सरकारी कार्यालयांत अनागोंदी माजली आहे. हात ओले केल्याशिवाय कामे होत नाहीत. सरकारी नियम दाखवून गोरगरिबांना छळले जाते आणि दोन नंबर धंदेवाल्यांना अभय दिला जातो. यावर “थिंक टँक” निर्भिडपणे आवाज उठवेल. जनतेच्या बाजूने आम्ही ठामपणे उभे राहू. कोणत्याही प्रकारच्या तक्रारी अथवा प्रश्न असल्यास नक्की संपर्क साधू शकता. डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) : 7972643230)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका