
विशेष वृत्त / डॉ.नाना हालंगडे
सांगोला नगरपरिषद निवडणुकीसाठी शेकाप, शिवसेना, काँग्रेसने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केल्याने भाजपनेही नगराध्यक्ष पदासाठी तगडा उमेदवार देण्याची तयारी केल्याने निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता असली तरी २० नोव्हेंबर नंतर वरिष्ठ पातळीवर घडामोडी घडून निवडणुकीचे आघाडीबाबत चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कोणी कितीही स्वबळाच्या वल्गना केल्या तरी सध्या गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे निवडणूक दुरंगी की तिरंगी हेच पाहणे औत्सुक्क्याचे ठरणार आहे.
सांगोला नगरपरिषद निवडणुकीसाठी सर्व पक्षीयात अनेकवेळा अनौपचारिक चर्चा, बैठका झाल्याची चर्चा आहे. या चर्चेस कोणीही दुजोरा दिला नाही. त्यामुळे चर्चा खरेच झाल्या का? याबाबत दावे, प्रतिदावे केले जात आहेत. सुरवातीला शिवसेनेचे मा.आ. शहाजीबापू पाटील यांनी आनंदा माने यांचे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाने माजी नगराध्यक्ष मारुतीआबा बनकर यांचे नाव जाहीर केले.
तर काँग्रेस पक्षाचे प्रांतीक सदस्य प्रा.पी.सी. झपके यांनी त्यांचा मुलगा विश्वेश झपके यांचे नगराध्यक्ष पदासाठी जाहीर केले आहे. तर त्यांच्याकडून वेळप्रसंगी भाजप कडून उमेदवारी घेण्याचीही तयारी केल्याचे बोलले जात आहे. परंतु राज्यातील प्रमुख सत्ताधारी असलेल्या भाजपने निवडणूक स्वबळावर लढविणार असे जाहीर करूनही अद्याप नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला नाही. याचा अर्थ पडद्याआड घडामोडी नक्की घडत आहेत असा दावा केला जात आहे.
शेकाप कार्यकर्त्यांनी आघाडी करताना कोणत्याही परिस्थितीत नगराध्यक्षपद इतरांना सोडू नये असे आ. डॉ.बाबासाहेब देशमुख यांना सांगितले आहे. तर मा. आ. शहाजीबापू पाटील यांनी आनंदा माने यांचे नाव जाहीर केले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, बाळासाहेब एरंडे हेही भाजपकडे नगराध्यक्ष पद कसे राहील यासाठी प्रयत्नशील आहेत. जर सर्वच पक्षांनी नगराध्यक्ष पदाची दावेदारी न सोडल्यास नगरपरिषद निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता आहे.
सध्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांत आघाडीबाबत संभ्रमावस्था असून जसजशी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. तोपर्यंत असेच होणार आहे. सर्वच प्रमुख पक्षानी सर्व २३ जागेसह नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. यंदा कदाचित आघाडीचे चित्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशीही स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आघाडी झाली तर २० नोव्हेंबर पर्यंत अथवा बहुरंगी लढत अटळ असल्याचे बोलले जात आहे.



