ताजे अपडेट
Trending

जवळ्यात रस्त्याच्या कामावरून शिवसेनेची धूळफेक

माजी जि.प. सदस्या स्वातीताई कांबळे यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार

Spread the love

सांगोला : प्रतिनिधी
मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पानंद रस्ते योजनेअंतर्गत सांगोला तालुक्यात प्रस्तावित एकाही रस्त्याच्या कामाला मान्यता मिळालेली नसताना किंवा आर्थिक तरतूद नसताना शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख जगदीश पाटील आणि माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे पुत्र दिग्विजय पाटील तसेच पुतणे सागर पाटील यांच्याकडून राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून जवळा जिल्हा परिषद गटातील नागरिकांच्या डोळ्यात धुळफक किंवा राजकीय स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य स्वातीताई कांबळे यांनी केला.

याबाबत त्यांनी गटविकास अधिकारी सांगोला यांच्याकडे लेखी तक्रार देऊन संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत जनतेत असणारा संभ्रम दूर करण्यासाठी खरी बाजू जनतेला कळावी म्हणून गटविकास अधिकाऱ्यांनी स्वतः खुलासा करावा असेही यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई कांबळे यांनी स्पष्ट केले.

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या गटातील भोळ्या भाबड्या जनतेला फसविण्याच्या उद्देशाने मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पानंद रस्ता या योजनेअंतर्गत एकही काम मंजूर नसताना या कामासाठी आर्थिक तरतूद नसताना किंवा कामाला प्रशासकीय मान्यता नसतांना गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे पुत्र दिग्विजय पाटील, पुतणे सागर पाटील आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगदीश पाटील यांनी जवळा जिल्हा परिषद गटातील गावोगावी या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाल्याचे बॅनर लावून परवानगी न घेता बेकायदेशीर जमाव जमवून सदरच्या कामाचे उद्घाटन करतात आणि याची सोशल मीडियावर जाहिरातबाजी करून या गटातील जनतेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे.

अनेक ठिकाणी त्यांनी स्थानिक लोकांना जमा करून त्यांना चुकीची माहिती देऊन त्या कामाची कोणतीही मान्यता नसताना या कामांचे उद्घाटन करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गटाकडून केला जात आहे.

मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानंद रस्ते योजने अंतर्गत सांगोला तालुक्यातील एकही काम अद्याप मंजूर नाही असे असताना सांगोला तालुक्यातील आणि प्रामुख्याने जवळा जिल्हा परिषद गटातील कामांचे उद्घाटन करण्याचा सपाटा सध्या माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे पुत्र दिग्विजय पाटील पुतणे सागर पाटील आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगदीश पाटील यांनी लावला आहे.

यापैकी एकाही कामाचे साधे अंदाजपत्रक तयार नाही, त्याला तांत्रिक मान्यता नाही, त्याची निविदा प्रक्रिया नाही, किंवा एकाही कामाचा कार्यारंभ आदेश झाला नसताना गोरगरीब जनतेच्या डोळ्यात धुळफेक करून निव्वळ राजकीय स्टंटबाजी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगून सामान्य जनतेची फसवणूक आणि दिशाभूल करणाऱ्या माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे पुत्र दिग्विजय पाटील, पुतणे सागर पाटील आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगदीश पाटील यांच्यावर प्रशासनाने त्वरित कायदेशीर कारवाई करावी आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी तसेच शेतकऱ्यांनी अशा भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन शेवटी माजी जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई कांबळे यांनी केले.

माजी आमदार शहाजीबापू पाटील हे ज्येष्ठ राजकीय नेते आहेत परंतु, त्यांच्या नावावर जवळा जिल्हा परिषद गटात त्यांचे पुत्र दिग्विजय पाटील, पुतणे सागर पाटील आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगदीश पाटील यांनी जो राजकीय थिल्लरपणा सुरू केला आहे तो अत्यंत अयोग्य आहे याची दखल खुद्द शहाजीबापूंनी घ्यावी आणि आपल्या मुलाचे, पुतण्याचे आणि पदाधिकाऱ्यांचे कान टोचावे. – स्वाती कांबळे, मा. जि.प.सदस्या, जवळा.

यापूर्वी कार्यारंभ आदेश झालेली कामेही झाली रद्द
गेल्या दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने अनेक पाणंद रस्ते मंजूर करण्यात आले होते. या कामाची अंदाजपत्रके तयार होती याची संपूर्ण निविदा प्रक्रिया होऊन ही कामे सुरू करण्याचे कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. मात्र तरीही ही कामे रद्द झाली होती आता तर एकाही कामाला मंजुरी नाही आर्थिक तरतूद नाही आणि विशेष म्हणजे कामाची अंदाजपत्रके तयार नसताना माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे पुत्र दिग्विजय पाटील पुतणे सागर पाटील आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगदीश पाटील यांनी चालवलेला खटाटोप निव्वळ निरर्थक आहे हा खटाटोप माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनीच आता थांबवावा असे माजी जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई कांबळे यांनी स्पष्ट केले.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका