
सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे
ईव्हीएममध्ये छेडछाड होत असल्याच्या आरोपात तथ्य नाही. तसं होत असतं तर मी सुध्दा कायतर कुटाना करून निवडून आलो असतो, असे गमतीशीर विधान माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
माजी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, माझी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट झाली. शिवसेनेचा प्रचंड मोठा विजय झाल्याने मी त्यांचे अभिनंदन केले. शिंदे साहेबांनी मला पक्षाच्या कामाची जबाबदारी दिली आहे. मी त्या दिवसापासूनच पक्ष संघटन वाढवण्याची जबाबदारी स्वीकारून कामालाही सुरुवात केली आहे. खा. संजय राऊत हे ईव्हीएम बाबत करीत असलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. संजय राऊत तुमचं घर भुईसपाट झालं आहे. विटा, पत्रे गोळा करून किमान झोपडं बांधून दाखवा, असा टोला शहाजीबापू पाटील यांनी लगावला.
ईव्हीएम मशीन भारतात पहिल्यांदा काँग्रेसचे सरकार असतानाच आली. काँग्रेसने प्रथम देशाची माफी मागावी आणि नंतर ईव्हीएम मध्ये छेडछाड करता येते हे पुराव्यासहित सिद्ध करून दाखवावे. ते त्यांच्याकडून शक्य नाही. पराभव स्वीकारण्याची त्यांची मानसिकता नसल्याने ते पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडत आहेत. ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करणे अजिबात शक्य नाही. तसं काही होत असते तर मी पण काहीतरी कुटाणा करून निवडून येऊ शकलो असतो.
ईव्हीएम विरोधातील आंदोलनात राहुल गांधी यांना आणून स्वतःची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत. महाविकास आघाडीचा नामुष्कीजनक पराभव झाल्याने त्यांना तोंड दाखवायला जागा उरली नाही. कोणत्या तोंडाने लोकांपुढे जायचे हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. त्यामुळे ते ईव्हीएमचे कारण सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत, असा टोला शहाजी बापू पाटील यांनी लगावला.



