थिंक टँक स्पेशल
Trending

बापूंच्या कपाळाला माती, शेकापचं कुड्याबावड्याचं राजकारण, आबांची कथित धाड!

‘यामुळं’ गाजली सांगोला नगर परिषद निवडणूक

Spread the love

…आघाडीचे खरे सूत्रधार हे पालकमंत्री जयकुमार गोरे होते. या आघाडीत शहाजीबापूंना स्थान मिळालं नसल्यानं ते प्रचंड चिडले होते. सुरुवातीला बापूंनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करत सडेतोड टीका केली.

सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे
एरव्ही राजकीयदृष्ट्या शांत असलेला सांगोला तालुका नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं प्रचंड तापला होता. भारतीय जनता पक्षानं सांगोल्याच्या राजकारणात घातलेलं लक्ष, मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांच्या जंगी सभा, इथल्या स्थानिक नेतेमंडळींची एकमेकांवरील कडवी टीका, उमेदवारांमधली प्रचंड चुरस, राजकीय पक्षांच्या कार्यालयावरील धाडसत्र अशा घटनांमुळं ही नगरपरिषद निवडणूक आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात ऐतिहासिक आणि संस्मरणीय ठरली. “बापूंच्या कपाळाला माती”, “शेकापचं कुड्याबावड्याचं राजकारण”, “आबांची कथित धाड!” ही राजकीय विधानं भूकंप घडवणारी होती. या सर्व राजकीय गदारोळात नेमक्या, रोखठोक आणि खणखणीत पत्रकारीतेमुळे “सांगोला पॉलिटिक्स” या सांगोला तालुक्यातील सर्वाधिक लोकप्रिय न्यूज चॅनलचीही यानिमित्ताने मोठी चर्चा झाली.

नेत्यांचा आश्चर्यजनक चकवा
निवडणूक घोषित होताच सर्व राजकीय पक्ष, नेते-मंडळी कामाला लागली होती. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सुरुवातीला शिवसेना आणि भाजप महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याचं घोषित केलं होतं. भाजप जिल्हाध्यक्ष चेतन केदार यांच्या साक्षीनं हा निर्णय झाला होता. मात्र ही घोषणा तीन दिवसांतच हवेत विरली. भाजपनं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मग बापूंनीही दंड थोपटलं. इकडं शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीही शेकाप स्वबळावर निवडणूक लढवेल, असं सांगत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मारूतीआबा बनकर यांचं नाव घोषित केलं. माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनीही नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार तयार ठेवला होता. तेही स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या मूडमध्ये होते.

या सर्व राजकीय घडामोडीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची एन्ट्री झाली आणि सांगोल्याच्या या राजकारणात मोठा सस्पेन्स तयार झाला. अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असलेल्या 17 नोव्हेंबर रोजी एक मोठं राजकीय नाट्य घडलं. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षानं घोषित केलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार मारुतीआबा बनकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचं कमळ हाती घेतलं आणि बनकर आबा यांनाच भाजपकडून नगराध्यक्ष पदाचं उमेदवार घोषित करण्यात आलं. तासाभरातच भाजपकडून मारुती आबा यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. ही राजकीय घटना सांगोलेकरांना चकवा देणारी होती. हे सर्व होईपर्यंत इकडं शहाजीबापूंनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून आनंदा माने यांना उमेदवारी अर्ज भरायला लावला.

आमदार बाबासाहेबांचा कणखरपणा
या सर्व राजकीय नाट्यामुळं शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्यावर प्रचंड टीका झाली. विचारधारेच्या मुद्द्याला धरून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न झाला. कार्यकर्तेही काही प्रमाणात नाराज झाल्याचे दिसत होते. मात्र या सर्व परिस्थितीला अत्यंत संयमानं, कणखरपणानं हाताळण्यात आमदार बाबासाहेब देशमुख यशस्वी झाले. विकासाच्या मुद्द्याला धरून भाजपसोबत आघाडी केली असल्याचे सांगून त्यांनी अत्यंत संयमाने ही परिस्थिती हाताळली. राजकीय नाट्यानंतर सर्वात प्रथम “सांगोला पॉलिटिक्स” या न्यूज चॅनलने आमदार बाबासाहेब देशमुख यांची सविस्तर मुलाखत घेऊन त्यांच्या मनातील भावना तालुकावासियांपर्यंत पोहोचवल्या. “सांगोला तालुक्याला भरघोस विकास निधी मिळावा, इथल्या प्रश्नांना शासन दरबारी न्याय मिळावा याच भावनेतून ही राजकीय तडजोड केल्याचं” त्यांनी ठणकावून सांगितलं. शेतकरी कामगार पक्षानं विचारधारा सोडली नाही, शेकापचा विचार हा जिवंत राहील, अशी कणखर भूमिका घेत आमदार बाबासाहेबांनी विरोधकांना चितपट केलं. भाजप सोबत गेल्यानं विरोधकांना आयतं खोलीत मिळालं होतं. मात्र या टीकेला आमदार बाबासाहेबांनी संयमी आणि कणखर भूमिकेतून सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

दीपकआबा आणि बापूमधला संघर्ष विकोपाला
भारतीय जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि दीपकआबा साळुंखे-पाटील यांचा गट अशी मिळून सांगोला शहर विकास आघाडी स्थापन झाली होती. या आघाडीचे खरे सूत्रधार हे पालकमंत्री जयकुमार गोरे होते. या आघाडीत शहाजीबापूंना स्थान मिळालं नसल्यानं ते प्रचंड चिडले होते. सुरुवातीला बापूंनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करत सडेतोड टीका केली. “भाजपचे हे हिडीस राजकारण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती लयास घालवल्याशिवाय राहणार नाही” अशी जहरी टीका केली होती.

ही टीका अंगलट येत आहे असे दिसतात शहाजीबापूंनी दोन दिवसातच “सांगोला पॉलिटिक्स” या लोकप्रिय न्यूज चॅनलवर प्रदीर्घ मुलाखत देताना यु टर्न घेतला. माझा राग स्थानिक भाजपवर आहे. राज्यातील भाजपबाबत माझं काहीही म्हणणं नाही, जयाभाऊ माझे जिवाभावाचे मित्र असल्याचं सांगत त्यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तोवर इकडं राजकारण पेटलं होतं. अशातच बापूंनी भाजप किंवा आमदार बाबासाहेब देशमुख यांच्यावरील रागाची दिशा बदलत आपले बाण आपला जुना दोस्त दीपक आबा यांच्या दिशेनं सोडण्यास सुरुवात केली. मग गप्प बसतील ते आबा कसले. त्यांनीही “सांगोला पॉलिटिक्स”ला सविस्तर मुलाखत देत बापूंचे बाण परतावून लावले.

बापू आणि आबांमध्येच वाद – प्रतिवाद सुरू झाले. अशातच प्रचाराचा धुरळा उडाला. सांगोला शहर विकास आघाडीकडून दीपक आबांनी बापूंच्या प्रत्येक टीकेला सडकून प्रतीटीका केली. प्रचाराच्या रणधुमाळीत आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या सुविद्य पत्नी डॉ. निकिताताई देशमुख यांनी अख्ख शहर पिंजून काढलं. भाजप नेते चेतनसिंह केदार, बाळासाहेब एरंडे, दीपक आबा, आमदार बाबासाहेब यांनी सभा गाजवल्या. तिकडे बापूंनी स्वतः अनेक प्रभागात जावून आनंदा माने यांच्यासाठी खिंड लढवली. शहर विकास आघाडीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी, शिवसेनेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतली.

ठळक राजकीय विधाने

शहाजीबापूंची गाजलेली विधाने
“भाजपचं हिडीस राजकारण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती धुळीस मिळवेळ. भाजपने शेकापवर अबलेसारखा अत्याचार केला. गोलमाल करावं ते माझ्या दीपकआबांनीच. दीपक साळुंख्यानं माझ्या ऑफिसवर पोलिसांना छापा टाकायला लावला.”

आ. बाबासाहेबांची गाजलेली विधाने
“शेतकरी कामगार पक्षाने आपली विचारधारा सोडलेली नाही. बापू तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांबाबत खासगीत काय बोलता हे मला सांगायला लावू नका. बापू तुम्ही आमच्या घरात भांडणं लावू नका. सांगोला तालुक्याच्या विकासाला मी बांधील आहे.”

दीपकआबांची गाजलेली विधाने
“बापूंच्या कपाळाला एवढे दिवस मी गुलाल लावत होतो. आता बापूंच्या कपाळाला मातीसुद्धा लावणार नाही. बापूंच्या राजकीय सभा म्हणजे डोंबाऱ्याचा खेळ आहे. कारण चौकात सभा घेतल्यावर गर्दी होतच असते. बापू एवढा नाटकी माणूस देशात शोधून सापडणार नाही. बापूचं राजकारण संपलंय. बापूला वेड्याच्या दवाखान्यात नेण्याची व्यवस्था करा.”

गाजलेल्या मुलाखती

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका