सांगोला तालुक्यातील शासकीय आरोग्यसेवा मृत्युशय्येवर!
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट रोखणार कोण?

सांगोला : नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील शासकीय आरोग्यसेवा मृत्युशय्येवर असल्यासारखी परिस्थिती आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी कधीकाळी देवदूत बनलेल्या या आरोग्य मंदिरांची अवस्था चीड आणणारी आहे. शासकीय आरोग्यसेवाच सक्षम नसल्याने गावागावांतून बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याचे दिसून येत आहे.
सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर येथे बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. त्यानिमित्ताने तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाले आहेत.
तर रुग्ण बोगस डॉक्टरांकडे जातील कशाला?
मुळात सांगोला तालुक्यातील आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. सरकारी आरोग्य केंद्रात वेळेत आणि पुरेशा प्रमाणात वैद्यकीय उपचार मिळत नसल्याने तसेच या आरोग्य केंद्रावर कोणाचाच वचक नसल्याने प्रशासन सुस्तावले असल्याने रुग्णांना व्यवस्थितपणे आरोग्य सेवा मिळत नाही. खाजगी दवाखान्यांमध्ये तुलनेत पैसे जास्त जात असले तरीही रुग्ण अशा खाजगी डॉक्टरांकडे जाताना दिसतात. मात्र “डॉक्टर” या नावावर लोकांचा मोठा विश्वास असल्याने ते डोळे झाकून डॉक्टरांवर विश्वास ठेवतात. बोगस कोण आणि खरा डॉक्टर कोण? हे ओळखण्यात त्यांची गफलत होते. शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम राहिली, आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांना चांगले उपचार मिळाले तर ही ग्रामीण भागातील जनता अशा बोगस डॉक्टरकडे कशाला जातील? असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे.
एका डॉक्टरवर कारवाई केली बाकीच्यांचे काय?
लक्ष्मी नगर येथे एका बोगस डॉक्टरावर कारवाई झाली. ही कारवाई स्वागतार्ह असली तरी फक्त एका कारवाईने आरोग्य यंत्रणा सुधारणार नाही. त्याच्यामुळाशी जावे लागेल. मूळ प्रश्न हा शासकीय आरोग्य सेवा सक्षम करणे हा आहे. तालुक्यात असे अनेक बोगस डॉक्टर छुप्या पद्धतीने उपचार करताना दिसून येतात. कोणतेही राजकारण न करता अशा बोगस डॉक्टरांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी लागेल. मात्र तसे होताना दिसत नाही कारण यामध्येही राजकारणाचा वास येऊ शकतो.
तालुक्याची स्थिती
सांगोला तालुक्यात ६ आरोग्य वर्धीनी केंद्रे आहेत. ४० उपकेंद्रे आहेत. एका आरोग्यवर्धीनी केंद्रात २ वैद्यकीय अधिकारी असतात. मात्र, ते रुग्णांना व्यवस्थित सेवा देत नाहीत. दुपारी १ नंतर ही केंद्रे बंद असतात. ४० आरोग्य उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी ही कंत्राटी भरती केलेली आहे. पण हेही कोणत्याच प्रकारची सेवा ग्रामीण भागात देत नाहीत. त्यामुळे तालुकाभर बोगस डॉक्टरांची चलती आहे.



