
सोलापूर : वृक्ष संवर्धनाचा जिल्ह्यातील एकमेव उपक्रम असलेल्या “भाईंची देवराई” या प्रकल्पास दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त बुधवार, १६ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आम.रणजितसिंह मोहिते-पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरोगामी युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख असतील. यावेळी आनंदा (भाऊ) माने, अतुल (मालक) पवार, रासपचे सोमाआबा मोटे, मार्केट कमितीचे चेअरमन जाधव साहेब, व्हाईस चेअरमन तुकाराम भुसनर, प्रा.किसन माने,विनायक कुलकर्णी,राजूभैय्या वाघमारे,मधुकर गोरड,यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे
भाईंच्या देवराईस दोन वर्षे पूर्ण झाली असून ही देवराई चांगलीच बहरली आहे. यामध्ये 118 जातीची 1100 झाडे आहेत. यापूर्वीही या देवराईस सांगोला तालुका धनगर समाज सेवा मंडळाच्या वतीने स्वागत कमान तर जिल्हा परिषद सदस्य ॲड.सचिन.देशमुख यांनी RO प्लांट दिलेला आहे. हा देवराई प्रकल्प 13 ऑगस्ट 2021 रोजी उभारण्यात आलेला आहे. निसर्गाच्या सानिध्यातील ही देवराई राज्यात सुप्रसिद्ध झालेली आहे.

भाई गणपतराव देशमुख हे राजकारणातील पितामह
सुसंस्कृत, आदर्शवादी पुढारी कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून भाई गणपतराव देशमुख यांच्या राजकीय कारकिर्दीकडे पाहिले जाते. शेकापशी एकनिष्ठ राहून स्व. गणपतराव देशमुख यांनी राजकारण केले असले तरी शेकापचे अथवा गणपतराव देशमुख यांचे कार्यकर्ते नसलेली माणसंही भाई गणपतराव देशमुख यांच्या विचारांनी प्रभावित झाली होती. केवळ आणि केवळ गणपतराव देशमुख यांचे सुसंस्कृत राजकारण यामागचे मुख्य कारण होते. अशा चाहत्यांपैकीच एक म्हणजे डिकसळचे डॉ. नाना हालंगडे होत.
डॉ. नाना हालंगडे यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली. पत्रकार हा कोणा एका पक्षाशी अथवा नेत्याशी बांधील नसतो हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले. त्यांनी अनेक माणसे पाहिली, माणसे वाचली आणि त्याच माणसांच्या पुढे यशकथा बनल्या. राजकारणावरही त्यांनी सातत्याने लेखन केले. त्यांच्या परखड लेखणीमुळे अनेक पुढारी दुखावले. शेकापवरही त्यांची लेखणी तुटून पडत होती.
भाई गणपतराव देशमुख यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे विचार अजरामर राहावेत यासाठी डॉ. नाना हालंगडे यांनी स्वमालकीची दोन एकर जमीन त्यांच्या नावे समर्पित केली. या दोन एकर जागेमध्ये त्यांनी विविध प्रकारचे दुर्मिळ, औषधी आणि उपयुक्त वृक्ष लावण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच भाईंची देवराई हा प्रकल्प आकारास आला.
खरं तर हा प्रकल्प साकारणे, स्वतःची दोन एकर लागवडीखालील जमीन कोणत्याही अपेक्षेविना यासाठी देणे हा खूप मोठा निर्णय होता. आजच्या जमान्यात माणसाची नियत बदलली आहे. मीपणा आणि मोठेपणाच्या नादात माणुसकी कुजत चालली आहे. एक कप चहा पाजताना स्वार्थ पाहिला जातो, विचार केला जातो. सध्याच्या सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांचे वागणे, त्यांची समाजात असलेली इमेज हा तर चिंतनाचा विषय आहे.
अशा मतलबी युगात एखाद्या नेत्याच्या स्मरणार्थ स्वतःची दोन एकर जमीन देवून त्यावर झाडांची लागवड करणे, दररोज त्यांची निगा राखून झाडे जगविणे ही दुर्मिळ घटना आहे. डॉ. नाना हालंगडे यांचा मित्र परिवार मोठा असल्याने त्यांना या कामात अनेकांनी मदतही केली.
झाडांसोबत विरोधकही उगवले
मागील वर्षभराच्या काळात भाईंच्या देवराईत लावलेली झाडे डेरेदारपणे मोठी होत होती. दुसरीकडे पोटशूळ उठलेले विरोधकही उगवत होते. भाईंची देवराई हा प्रकल्प कोणत्याही एका पक्षाशी संबंधित नसताना या प्रकल्पास गणपतराव देशमुख यांचे नाव दिले असल्याने अनेकांनी खूप मोठा गैरसमज करून घेतला. भाई गणपतराव देशमुख हे फक्त शेकाप पुरते मर्यादित नव्हते हे कळण्यासाठी एक पिढी जावी लागेल अशी स्थिती आहे. काही असंतुष्ट लोकांनी छुपा विरोध सुरू केला. काही समाजकंटकांनी भाईंच्या देवराईतील फलकांची एकदा नव्हे तीनदा तोडफोड केली. त्यावेळी या प्रकल्पाच्या समर्थकांनी डॉ. नाना हालंगडे यांना बळ दिले. हा प्रकल्प म्हणजे निसर्ग संवर्धनाचे कार्य समजून डॉ. नाना हालंगडे यांनी अव्याहतपणे हे कार्य सुरूच ठेवले आहे.
झाडे बहरली
भाईंची देवराई हा प्रकल्प डोंगराच्या पायथ्याशी वसला असल्याने हे ठिकाण आगामी काळात पर्यटनाचे केंद्र बनू शकते. सध्या या प्रकल्पात सर्वच झाडे बहरली आहेत. डॉ. नाना हालंगडे यांनी घेतलेले परिश्रम आकाराला येत असल्याचे दिसून येते. या कार्यात त्यांच्या मित्र परिवाराचे त्यांना मोठे पाठबळ मिळत आहे.
हेही वाचा
59 वर्षे एकच झेंडा आणि पक्ष : निष्ठेचं दुसरं नाव ‘भाई गणपतराव देशमुख’



