परिवर्तनाचा वर्षावास

मिलिंद मानकर (नागपूर) यांची स्पेशल स्टोरी

Spread the love

बौद्ध धम्मात वर्षावासाला मोठे महत्त्व आहे. या मागे तथागत गौतम बुद्धांची नेमकी भूमिका काय होती? तथागतांनी याच मंगलदिनी भिक्खूसंघाला कोणता संदेश दिला? या काळात बौद्ध उपासकांनी बुद्धविहारात जाणे का महत्त्वाचे आहे? आदी मुद्द्यांचे महत्त्वपूर्ण विवेचन करणारी मिलिंद मानकर (नागपूर) यांची विशेष स्टोरी नक्की वाचा. इतरांना शेअर करा.

तथागतांचा भिक्खूंना संदेश
आषाढी पौर्णिमेपासून बौद्ध भिक्खूंच्या वर्षावासाला सुरुवात होत आहे . ‘चरथ भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हा महामंत्र तथागतांनी याच मंगलदिनी भिक्खूसंघाला दिला. वर्षावास म्हणजे भिक्खूंनी वर्षाऋतूत एकाच विहारात राहून बुद्धचरणी लीन व्हावे. आषाढी पौर्णिमा तत्त्वनिष्ठेला प्राधान्य देण्याची शिकवण देते. सर्वस्व त्याग करण्याची मानसिकता निर्माण करते. जगाला प्रेम आणि विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या महाकारुणिक बुद्धानी वर्षावास सुरू केला. ‘चरथ भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हा महामंत्र दिला.

पहिला वर्षावास पंचवग्गीय भिक्खूसमोर
बुद्धांनी आषाढी पौर्णिमेला सारनाथ येथील इसीपतन मृगदायवनात पहिला वर्षावास पंचवग्गीय भिक्खूसमोर करून जगात सर्वप्रथम धम्मचक्र प्रवर्तन केले. त्यामुळे या पौर्णिमेला ‘गुरुपौर्णिमा’ असेही म्हटले जाते. आषाढी पौणिमेलाच माता महामायाला सिद्धार्थाच्या रूपाने गर्भधारणा झाली आणि याच दिवशी बुद्धांनी सर्वसंगपरित्याग अर्थात गृहत्याग केला असा इतिहासात उल्लेख आहे . त्यामुळे बौद्ध धम्मात आषाढी पौर्णिमा अतिशय मंगल आणि पवित्र समजली जाते.

पावसाळ्यात एकाच ठिकाणी राहण्याचा नियम
पावसाळ्यात नदीनाले तुडुंब भरल्याने भिक्खूंना धम्मप्रचाराकरिता अनेक अडचणींचा सामना करावा लागे. गावोगावी पोहाचणे अत्यंत कठीण होते म्हणून पावसाळ्यात एकाच ठिकाणी राहण्याचा नियम बुद्धांनी केला . बुद्ध म्हणाले , “भिक्खूंनो ! तुम्ही गावात भिक्षाटनाला जाऊ नका. भिक्खूंच्या समूहाने शेतीचे नुकसान होते. जंतू – किड्यांची भीती असते. त्यामुळे एकाच विहारात तीन महिने घालवा. ‘आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा’ या मधल्या काळाला बौद्धधम्मात ‘वर्षावास ‘ असे म्हणतात.

उपासकांनी बुद्धविहारात जावे
‘इमस्मि विहारे ते मासं वस्सामि उपेमि’ अर्थात – या विहारात आम्ही तीन महिने विहार करू. धम्मचिंतन, मनन, पठन, कथन, स्वचित्ताचे संशोधन करून भिक्खू वर्षावासाला सुरुवात करतात. बुद्धकाळापासून सुरू झालेली वर्षावासाची ही महान परंपरा आजतागायत सुरू आहे.

बुद्धांनी आपल्या जीवनात ४५ वर्षावास केले
या तथागत बुद्धांचे अनेक कारुणिक उपदेश याच काळात संग्रहित झाले. भिक्खूंनी ‘उपासकांनी गंधकुटी, संघाराम अशा ठिकाणी ग्रहण केले. श्रद्धाळू उपासकांनी अनेक संघाराम (विहार) बुद्धाला उदार अंतःकरणाने दान दिले. राजा बिंबिसार यांचे वेळूवन, अनाथपिंडिकाचे जेतवन, जीवकाचे आम्रवन, ‘मिगारमाता’ विशाखाचे पूर्वाराम, अनुपम सौंदर्यवती आम्रपालीचे आम्रवन प्रमुख आहेत. बुद्धांनी आपल्या जीवनात ४५ वर्षावास केले. त्यापैकी २५ वर्षावास श्रावस्तीत अनाथपिंडिकाच्या जेतवनात केले. १९ वर्षावास राजगीर येथील राजा बिंबिसाराच्या वेळुवनात केले.

‘वर्षा’ म्हणजे पाऊस, ‘वास’ म्हणजे राहणे. तथागत बुद्धांनी पावसाळ्याच्या दिवसात भिक्खूना आषाढी ते अश्विन पौर्णिमेपर्यंत एकाच ठिकाणी तीन महिने वास्तव्य करण्याचा नियम घालून दिला. त्याला ‘वर्षावास’ असे म्हणतात. वर्षावासाचे बौद्ध धम्मात आत्यंतिक महत्त्व आहे. वर्षावासाच्या काळात प्रत्येक बौद्ध उपासकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाचे वाचन, पंचशीलाचे काटेकोरपणे आचरण, अष्टांगिक मार्गावर चालण्याचा संकल्प, धम्मश्रवण – धम्मचर्चा, महान भिक्खूसंघाला भोजनदान आणि जवळच्या विहाराला भेट देऊन आपल्या हातून कोणतेही अकुशल कर्म घडू नये याची दक्षता घेऊन जास्तीत जास्त कुशल कर्मे केली पाहिजे , हाच या पावन वर्षावासाचा संदेश आहे.

ग्रंथांचे व्हावे सामुहिक वाचन
विहारातून तथागतांनी प्रेम, दया, करुणा, शांतीची अनमोल शिकवण दिली. बौद्ध उपासकांनी शील ग्रहण करणे, अष्टशील उपोसथ पाळणे, धम्मश्रवण करणे अशी मोलाची संधी वर्षावासाच्या निमित्ताने लाभलेली असते. त्यामुळे उपासक – उपासिकांनी बुद्ध विहाराचा परिसर स्वच्छ ठेवावा. बुद्ध विहाराची सजावट करावी. विहारात सकाळ – संध्याकाळ बुद्ध वंदना घ्यावी. चारित्र्यवान, शीलवान, त्यागशील भिक्खूसंधाला धम्मदेसनेला व भोजनाला आमंत्रित करावे. त्यांना दान देऊन दानपद्धती वाढवावी . ‘धम्मपद’, ‘मिलिन्द प्रश्न’ , ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाचे वाचन करावे. भिक्खू उपलब्ध नसल्यास गावातीलच सुशिक्षित व शीलवान व्यक्तीकडून ग्रंथ वाचून घ्यावा. ग्रंथ वाचनावर सर्वांची सहमती व्हावी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत तीन महिने चालणाऱ्या ग्रंथवाचनाला प्रत्येक घरातून एकाने तरी उपस्थित राहावे असा दंडक घालून दिला पाहिजे.

बौद्धस्थळी भेटी द्याव्यात
बौद्ध संस्कृतीचा अनमोल ठेवा जपण्यासाठी प्रत्येक रविवारी बौद्ध अनुयायांनी विहारात गेले पाहिजे. प्रत्येक पौर्णिमेला शुभ वस्त्र परिधान करून बुद्ध लेण्यांच्या, स्तूपांच्या दर्शनासाठी गेले पाहिजे. प्राचीन बौद्धस्थळी जाऊन बुद्धाला मानवंदना दिली पाहिजे. शिवाय प्राचीनकाळच्या भिक्खूसंघालासुद्धा मानवंदना दिली पाहिजे. भिक्खू हे चारित्र्यसंपन्न सर्व समाजासाठी पथदर्शक असतात. आपल्या अथक उपासनेतून धम्माचा अमोल संदेश देण्याची क्षमता त्यांनी आत्मसात केलेली असते. एखाद्या वस्तूला प्रेमभावाने स्पर्श करणे, आदर करणे, नतमस्तक होणे यामुळेच मनुष्यात प्रेमाचा झरा उत्पन्न होतो. वर्षावासाच्या काळात उमलत्या पिढीसाठी धम्मसंस्कार वर्ग चालवावे. सोबतच त्रिशरण, पंचशील, अष्टशील, बुद्धपूजा, त्रिरत्न वंदनासुद्धा शिकवावी. असे केल्याने मुलांना धम्माची गोडी लागेल आणि विहारातील वर्षावास यशस्वी होईल.

धम्माची शिकवण सत्यावर अधिष्ठित
विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे धम्मसंस्कारामुळे आचरणात निश्चितच चांगला बदल घडून येतो. विद्यार्थ्यांना ही गोष्ट सांगितली पाहिजे की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला बुद्ध धम्म हा संपूर्ण जगातील सर्वश्रेष्ठ आणि पवित्र असा धम्म असून तो मानवी जीवनाला पोषक आहे. जीवन जगण्याची कला म्हणजे बुद्धधम्म होय. धम्माची शिकवण सत्यावर अधिष्ठित आहे. धम्माच्या शिकवणुकीनुसार आचरण केले तर खऱ्या अर्थाने जीवनाचे सार्थक होते.

बाबासाहेबांनी कोणता आदेश दिला?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘या जगात सर्वश्रेष्ठ आणि पवित्र कोणते महान कार्य असेल तर ते म्हणजे बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे होय.’ बाबासाहेबांच्या या आदेशाकडे सर्वांनी गांभीर्याने पाहावे. धम्मकार्य करूनच पाहावे, धम्मसागरात आकंठ बुडावे आणि अनुभव घ्यावा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धम्म समजून देणाराचे आणि धम्मश्रवण व आचरण करणाऱ्या दोघांचेही कुशलकर्म संचित होते, पुण्यकर्म संचित होते, सत्कर्म संचित होते. त्याचे जीवन अधिकाधिक धम्ममय, मंगलमय होऊन तोच खरा जीवनाचा आनंद लुटत असतो. आज समाजात आई-वडील, भाऊ, बहीण सारखी पवित्र नाती दिवसेंदिवस एकमेकांपासून दुरावत आहेत. सर्वांना एका सूत्रात गुंफून ठेवणारा प्रेमाचा, मायेचा धागा तुटत आहे . झपाट्याने होत असलेल्या मानवी मूल्याचा हासाला बौद्ध धम्मातील ‘वर्षावास’ हा एक आशेचा किरण आहे.

– मिलिंद मानकर, नागपूर

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका