
सांगोला : विशेष प्रतिनिधी
हल्ली अनेक शहरांमध्ये कचऱ्याची समस्या भीषण रूप धारण करत आहे. मोठ्या प्रमाणात साचणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असते. सांगोला शहराची ही गरज ओळखून आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला शहर कचरा मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्यांनी यासाठी व्यक्तिगत लक्ष घालून सांगोला शहर कचरा मुक्त करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर करून आणला आहे. या प्रकल्पासाठी तब्बल १ कोटी ६० लाख ७८७ रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.
स्वच्छ सांगोला सुंदर सांगोला शहरासाठी सर्व प्रकारच्या घनकचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन व शाश्वत स्वच्छता आणि वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सांगोला नगरपालिकेला १ कोटी ६० लाख ३३ हजार ७८७ रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

तांत्रिक समितीच्या बैठकीत ही मान्यता मिळाली आहे. नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी याबाबतचा शासनादेश काढला आहे.
या प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये
- ओला कचरा कंपोस्ट प्लॅन्टसाठी ८१ लाख ७२ हजार २१६ रुपये.
- सुका कचरा कंपोस्ट प्लॅन्टसाठी २८ लाख ३३ हजार ४७१ रुपये.
- वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ५० लाख २८ हजार १०० रुपये खर्चाच्या प्रकल्पाला मंजुरी.
- हा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित झाल्यास सांगोला शहराचा कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.



