मराठ्यांनो, तुम्हाला डाव जिंकायचा आहे की, फक्त शड्डू ठोकायचा आहे?
संजय आवटे यांचा खणखणीत लेख

जातीच्या आधारावर संघटित होणे, मग ते कोणाचेही असो, गैर आहेच. पण, जात हे आपले सामाजिक वास्तव आहे, तोवर जातीच्या नावाने काही मागणे, आक्षेप व्यक्त होणे स्वाभाविक आहे. त्या न्यायाने मराठे एकवटत असतील, तर त्यात विरोध करण्यासारखे काहीच नाही. मराठे ज्या मागण्या करताहेत, तो या सभांचा ‘आवाज’ फक्त आहे. प्रत्यक्षात हा समूह दुखावला गेला आहे. त्याला अनेकविध कारणे आहेत. हे दुखावलेपण समजून घेतले पाहिजे, यात शंका नाही.
मराठ्यांच्या दुटप्पीपणाविषयी बोलले जाते, तसेच एका दुभंगलेपणाचे ते शिकारही आहेत. बदलत्या काळात ब्राह्मण शिताफीने आणि द्रष्टेपणाने चक्क दलित जाणिवांचेही नेतृत्व करु लागले. तर, दलित ब्राह्मणी रोल मॉडेलच्या दिशेने जाऊ लागले. या दोन्ही जाणिवांपासून समान अंतरावर उभ्या असलेल्या मराठ्यांना मात्र दोहोंनी सोडून दिले. पापाचे सारेच वाटेकरी आकस्मिक वेगळ्या वाटांवर उभे राहिले आणि सारे खापर मराठ्यांच्या डोक्यावर येऊन पडले. त्यातून खलनायक अशी प्रतिमा तर निर्माण झालीच, पण या बदलाच्या रेट्यात मराठे आणखी मागे मागे रेटले गेले.
सत्ताधीशाचा डायलेमा हा सुपरस्टारसारखा असतो. त्याला स्वतःमध्ये फार बदल करता येत नाहीत. ज्यांना काहीच गमावण्यासारखे नसते, असे समूह मात्र झटकन बदल करु शकतात. हे सारे समजेपर्यंत जग खूप बदलले. आणि, जातींच्या नावाने दुकाने थाटत नवी सत्ता संपादन करणा-यांनी मराठ्यांना मात्र जातीयवादी ठरवले. ब्राह्मणांनी द्रष्टेपणाने नवा काळ ओळखला आणि या पापापासून मुक्त होत, फुले- आंबेडकरांवरील ऑनलाइन व्याख्यानांची तयारी सुरु केली.
या सगळ्या उलथापालथीत मराठे एकाकी पडले. कारण, आपण थोर, आपले पूर्वज थोर याच आडमुठेपणात ते रुतून बसले. एखादा मराठा बदलला, तरी त्याचा विठ्ठल रामजी शिंदे झाला!
म्हणजे, वंचितांना सत्ता मिळणे ही स्वाभाविकता असताना, या वंचितांच्या जोडीने किंवा त्याहून अधिकच सत्ता मिळवण्यात ब्राह्मणांना यश आले. म्हणजे, जे मराठ्यांचे पार्टनर वा चाणक्य होते, ते शिताफीने दलितांचे-ओबीसींचे पार्टनर झाले. तत्कालीन प्रस्थापितांचे आश्रितही पुनर्पस्थापित झाले. विस्थापित प्रस्थापित होऊ लागले. आणि, मराठ्यांना ॲटी इनकम्बन्सीचा फटका बसला. त्यात त्यांचे दोष होतेच, पण जे या प्रक्रियेत पुढे गेले, ते गुणीच होते असे नाही. मराठे दोहोंकडून मागे मागे रेटले गेले.
‘पाटलाचा नाद नाय करायचा’, अशा नादात राहिलेल्या पाटलाच्या नादी खरेच कोणी लागले नाही! ही अवस्था त्या पाटलांची, जे खरेच पाटील होते. मराठा सत्ताधीश असतानाही जे बापडे निर्धन होते, असे बहुसंख्य तर आणखी निराधार होत गेले! त्यात जातीबरोबर मातीचा प्रश्न आहे, तो आणखी वेगळाच.
आता या वळणावर मराठे उभे आहेत आणि ते दुखावले गेले आहेत. त्यांना त्यांची शक्ती दाखवायची आहे. पाटलांनी शक्ती दाखवायला सुरुवात केली, की, “वा वा पाटील, तुम्ही म्हणजे भारीच”, असे म्हणणारे चाणक्य लगेच उभे राहात असतात. त्या आत्ममश्गुलतेनेच आपले आजवर नुकसान केले.
आपले प्राधान्यक्रम काय आहेत, ते निश्चित करायला हवेत. ‘बघतोस काय, मुजरा कर!’ अशा अस्मितेने ‘एक मराठा… लाख मराठा’ वगैरे संघटन आगामी काळात होत गेले, तर ते न्यूनगंडाच्या गर्तेत जाण्याचे भय असते. त्यातून इतर सर्व समूहांना मराठ्यांच्या विरोधात उभे करण्याचा डाव खेळला जाऊ शकतो. दलित-ओबीसींना ब्राह्मणांपेक्षा मराठे अधिक धोकादायक वाटतात, ते त्यांच्या संख्येमुळे आणि त्यांनी वापरलेल्या बळामुळे. तो इतिहास मराठ्यांनी आता नाकारला हे खरे, पण असे पर्सेप्शन निर्माण होऊ शकते. त्यातून मराठे आणखी दूर फेकले जातील.
आज या राज्यात अपवाद वगळता शक्तिशाली मराठा मंत्री नसताना राज्यकारभार सुरु आहे. दिल्लीस्थित प्रस्थापितांना इथल्या मराठ्यांचा तेजोभंग नेहमीच करायचा होता. ते शक्य होऊ नये, असे वाटत असेल तर सगळ्या वंचित जातीसमूहांचे, मुस्लिमांचे, दलितांचे हितसंबंध लक्षात घेऊन, त्यांना सोबत घेऊन व्यापक असे समाजकारण-राजकारण मराठ्यांना उभे करावे लागेल. पुरंदरेंना नाकारताना पानसरेंना आठवावे लागेल. कोपर्डीचा निषेध करताना, आपल्या लेकीला सावित्रीच्या लेकीसारखे घडवावे लागेल. शाहू-फुले-आंबेडकरांशी जैव नाते निर्माण करावे लागेल. ब्रिगेड अथवा संघाऐवजी रयतेचं राज्य उभं राहावं, यासाठी झटावं लागेल!
आयटीच्या मळ्यात ब्राह्मण रमले. आता ते ‘एआय’ची चर्चा करू लागले आहेत. समुद्र उल्लंघनास विरोध करणारे ब्राह्मण आता समुद्रासह सगळे उल्लंघन रोज करू लागले आहेत. जातीची चौकट आखणारे ब्राह्मण आज सर्वाधिक आंतरजातीय लग्नं करताहेत. पती निघनानंतर बायकांना जिवंतपणी ज्या जातीत जाळले जात होते, तिथे ज्येष्ठांच्या ‘लिव्ह इन’बद्दल चर्चा सुरू झाली आहे. कोणे एके काळी ज्यांना अस्पृश्य मानले गेले, ते शिकले आणि आरक्षणाचा अवकाश सोबत घेत वेळीच नव्या दिशेने निघाले. मराठे मात्र आपल्या वाड्यात अडकून पडले.
महाराष्ट्र आज जो काही पुरोगामी आहे, त्याचे एक कारण बहुसंख्य आणि शक्तिशाली असलेल्या मराठ्यांचे उदार असणे हेही आहेच. छत्रपती शिवरायांपासून ते यशवंतराव चव्हाणांपर्यंत असा वारसा सांगता येणे शक्य आहे. सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन मराठ्यांनी या राज्याला पुरोगामी चेहरा दिला. तेच मराठे आज खलनायक भासू लागले आहेत. तशी व्यवस्था केली जात आहे. ज्या नेत्याभोवती एकवटण्याची वेळ मराठ्यांवर आज आली आहे, त्यावरून तर हे केविलवाणे असणे ठळकपणे जाणवत आहे.
मुळात जिथे सरकारी नोक-या संपत चालल्या आहेत. कंत्राटी नोकरभरती होऊ लागली आहे. शिक्षकच काय, पोलीस आणि सैनिकही कंत्राटी पद्धतीने भरले जात आहेत. खासगी क्षेत्रात आरक्षण नाही. आज अशी स्थिती आहे की, ॲडमिशन वा स्पर्धा परीक्षांमध्ये ओबीसीचे मेरिट हे अनेकदा ओपनहून अधिक जाण्याची वेळ येते. अशावेळी आरक्षणाचे मुळात मोल काय? त्यापेक्षा वेगळे काही करता येणे शक्य आहे. सर्व मराठा मोर्चांचा एकत्रित खर्च शेकडो कोटी होता. स्मारकं आणि प्रतिकांवर होणारा करोडो रूपये खर्च आणखी वेगळाच. असे हजारेक कोटी रूपये रस्त्यांवर फेकण्यापेक्षा विधायक मार्गाने खर्च करून रचनात्मक काही उभे करता येणार नाही का?
मराठा पोरं-पोरी आयटीत जावीत, आयआयटीत चमकावीत, आयएएस व्हावीत, शास्त्रज्ञ व्हावीत, लेखक- विचारवंत- संपादक व्हावीत, प्राध्यापक व्हावीत, राजकारणात यशस्वी व्हावीत, उद्योजक आणि श्रीमंत शेतकरी व्हावीत, यासाठी भरीव काही करता येणार नाही का? रस्त्यावर उतरण्यापेक्षा हे करणे अधिक आवश्यक नाही का? आरक्षण हा मुद्दा सामाजिक न्यायाचा आहे. त्यामुळे आरक्षण मागण्यापेक्षा असे रचनात्मक काही उभे करणे गरजेचे नाही का?
अन्यथा, मराठा आवाज बुलंद होत जाईल, त्या प्रमाणात त्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न होईल आणि मग मराठा बागुलबुवा निर्माण तेच करतील आणि तेच तुमच्याखालची उरलीसुरली सतरंजीही काढून घेतील.
अशी हरणारी लढाई तुम्हाला लढायची आहे का? मला सांगा, तुम्हाला हा डाव जिंकायचा आहे की फक्त शड्डू ठोकायचा आहे?
– संजय आवटे (नामवंत संपादक)
संजय आवटे यांचे गाजलेले लेख



