ताजे अपडेट
Trending

सांगोल्यात मतमोजणीला दणक्यात सुरुवात

तहसील परिसरात कार्यकर्त्यांची अलोट गर्दी

Spread the love

तीनही उमेदवारांनी अत्यंत ताकतीने ही निवडणूक लढली असून तिघांनीही प्रचार सभांचा धडाका उडवून दिला होता. या निवडणुकीत खालच्या पातळीवर कोणतेही आरोप प्रत्यारोप झाले नाहीत. अत्यंत शांततेत तरीही मोठ्या चुरशीने ही निवडणूक झाली आहे. तीनही पक्षाच्या उमेदवारांनी आपणच विजय होणार असा दावा केला असल्याने विजयाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार? याचा अंदाज कुणालाही बांधता आला नाही

सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे
सांगोला विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आपल्या नेत्याच्या विजयाचे साक्षीदार बनण्यासाठी तालुक्यातून विविध पक्षांचे हजारो कार्यकर्ते सांगोला शहरात दाखल होत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सांगोला शहरातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचारी मिळुन सुमारे १०० जणांची टीम कार्यरत झाली आहे. मतमोजणीसाठी एकूण २३ फेऱ्या होणार असून त्यासाठी १४ टेबल ठेवण्यात आले असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे यांनी सांगितले.

मतमोजणी सुलभ होण्यासाठी विविध अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण मतमोजणीसाठी नियंत्रण अधिकारी, स्लिप मोजण्यासाठी अधिकारी, स्ट्रॉग रूमसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि ९ कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत.

हे १३ उमेदवार रिंगणात
दीपकआबा साळुंखे (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे), शशिकांत गडहिरे (बहुजन समाज पार्टी), शहाजी पाटील (शिवसेना), बाबासाहेब देशमुख (शेकाप), राघू घुटुकडे (न्यू राष्ट्रीय समाज पार्टी), एकनाथ शेंडगे (अपक्ष), परमेश्वर गेजगे (अपक्ष), बाळासाहेब देशमुख (अपक्ष), बाळासाहेब इंगोले (अपक्ष), मोहन राऊत (अपक्ष), रणसिंह देशमुख (अपक्ष), राजाराम काळेबाग (अपक्ष), ज्ञानेश्वर उबाळे (अपक्ष).

एवढे आहेत मतदार
सांगोला विधानसभा मतदारसंघात ३ लाख ३३ हजार ४९३ मतदार असून त्यामध्ये १ लाख ७२ हजार ७०४ पुरूष, १ लाख ६० हजार ७८४ स्त्री व ५ इतर मतदार आहेत.

झालेले मतदान
एकूण झालेले मतदान २ लाख ६१ हजार १३ आहे. त्यामध्ये १ लाख ३६ हजार ५४८ पुरुष, १ लाख २४ हजार ४६४ स्त्री व १ इतर असे एकूण ७८.२७ % मतदान झाले आहे.

तिघांमध्येच मुख्य लढत
सांगोला विधानसभा निवडणुकीसाठी तिघांमध्येच मुख्य लढत झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील, तर शेतकरी कामगार पक्षाकडून डॉ. बाबासाहेब देशमुख या तीन मुख्य उमेदवारांमध्येच खरी लढत होत आहे. तीनही उमेदवारांनी अत्यंत ताकतीने ही निवडणूक लढली असून तिघांनीही प्रचार सभांचा धडाका उडवून दिला होता. या निवडणुकीत खालच्या पातळीवर कोणतेही आरोप प्रत्यारोप झाले नाहीत. अत्यंत शांततेत तरीही मोठ्या चुरशीने ही निवडणूक झाली आहे. तीनही पक्षाच्या उमेदवारांनी आपणच विजय होणार असा दावा केला असल्याने विजयाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार? याचा अंदाज कुणालाही बांधता आला नाही. विविध संस्थांनी वर्तविलेल्या एक्झिट पोलमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाबासाहेब देशमुख हेच विजय होतील असा कयास बांधण्यात आला होता. असे असले तरीही दीपकआबा साळुंखे-पाटील आणि शहाजीबापू पाटील यांचे कार्यकर्ते एक्झिट पोल कोणाच्याही बाजूने असला तरी विजय आमच्याच असल्याचा दावा करत आहेत.

पोलिस बंदोबस्त
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भवन मध्ये हि मतमोजणी पार पडत आहे या मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यासह बाहेरील पोलीस कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने या परिसरात बंदोबस्त देत आहेत. अधिकृत पास असल्याशिवाय कोणालाही या परिसरात प्रवेश दिला जात नाही. 200 मीटर च्या बाहेर विविध पक्षांचे कार्यकर्ते उभे आहेत.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका