
सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला शहरातील बनकरमळा येथील कार्यकर्त्यांनी माझा व आमच्या कुटुंबाचा जो सत्कार केला याबद्दल आभार व्यक्त करून तुम्ही जेवढे मताधिक्य दिले तेवढी झाडे लावत आहात हा स्तुत्य उपक्रम आहे. ज्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत कष्ट घेतले त्या सर्वांचा मी ऋणी आहे. सांगोला शहराच्या पश्चिम भाग हा आपल्या शेकापचा बालेकिल्ला आहे, तो तुम्ही सार्थ ठरविला आहे. तुम्ही ज्या मागण्या केल्या आहेत त्या येत्या ५ वर्षात निश्चित पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. दिवंगत भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रमाणेच आपण समाजकारण करणार असून निवडणुक संपली आहे आता आपण सर्वांना सोबत घेऊन समाजकारण करूया. येणाऱ्या काळात शहरात सर्वांना सोबत घेऊन विकासकामे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नूतन आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
सांगोला येथील बनकरमळा येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभ तसेच क्रांतीज्योती नागरी सहकारी पतसंस्था व परिवार,माऊली प्रतिष्ठान व आर. ए.बनकर मित्र परिवार यांचे तर्फे आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दिवंगत भाई गणपतराव देशमुख यांच्या रूपाने पत्नी रतनबाई देशमुख, डॉ. निकिताताई देशमुख, माजी नगराध्यक्ष मारुतीआबा बनकर, बाळासाहेब एरंडे, आर. ए. बनकर, सीए उत्तम बनकर, रमेश बनकर, नगरसेवक गजानन बनकर, विजय राऊत, सुरेश माळी, भिमराव बनकर, सचिव सोमनाथ माळी, पांडूरंग बनकर सर, महादेव बनकर सर, सोमनाथ राऊत, सतीश माळी, क्रांतीज्योती पत संस्थेच्या सर्व महिला संचालक, नागरीक तसेच बनकर मळा परिसरातील महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब देशमुख पुढे म्हणाले, माझ्या सत्काराने मी हुरळून जाणार नाही. तुम्ही २३० झाडे लावण्याचा जो संकल्प केला तो निश्चित चांगला आहे ही झाडे जतन करण्यासाठी प्रयत्नशील रहा, मी विधानसभेत प्रवेश करीत असताना सुरक्षा रक्षकाने अडविले, त्यांना म्हणालो “मला पास नाही परंतु मी निवडूण आलो आहे. उद्या शपथविधी आहे पास नाही पण दिवंगत गणपतराव देशमुख यांचा मी नातू आहे” असे सांगितल्यावर मला त्यांनी सोडले.
म्हणजेच गणपतराव देशमुख यांच्या नावास एक वेगळे वजन आहे. भाई गणपतराव देशमुख हे निवडणूकी पुरते राजकारण करायचे परत समाजकारण करायचे. त्याप्रमाणे आता निवडणूक संपली आहे. आपणही आता समाजकारण करूया. जरी विरोधक असला तरीही त्याला सोबत घेवूया. ६० वर्षे आबासाहेबानी जो शांतता व सुसंस्कृतपणा जपला तोच विचार आपणास पुढे न्यायचा आहे , तुम्ही सांगितलेली कामे येणाऱ्या काळात निश्चित पूर्ण करू असे सांगितले.



