
(सांगोला/ नाना हालंगडे) इंदापूर–विजापूर या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गावरील कडलास गावालगतचा रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून अक्षरशः खड्ड्यांनी व्यापलेला असून, नागरिकांना मृत्यूच्या छायेखाली प्रवास करावा लागत आहे. अवजड वाहतूक, पावसाळ्यानंतरची दुरवस्था आणि संबंधित विभागाचे निष्क्रिय धोरण यामुळे हा मार्ग ‘राष्ट्रीय महामार्ग’ या नावालाही मारक ठरत आहे. या रस्त्यामुळे अपघातांची मालिका, धुळीमुळे श्वसनाचे वाढते आजार, तसेच गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. परिस्थिती टोकाला गेल्याने ग्रामस्थांनी यावेळी ठाम भूमिका घेत दुरुस्तीची तातडीची मागणी केली आहे.
कडलासजवळील महामार्गावरील मोठमोठे खोल खड्डे, रस्त्याच्या दोन्ही कडांवरील तडे, उडणाऱ्या धुळीचे साम्राज्य आणि वेगाने धावणारी अवजड वाहने या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून रस्ता प्रवाशांसाठी ‘जोखमीचा रस्ता’ ठरला आहे. अनेक वाहनचालकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते.
गेल्या काही महिन्यांत या रस्त्यावर अनेक अपघात घडले असून, शेतकरी, विद्यार्थी, महिला यांचा दुर्दैवी मृत्यूही झाला आहे, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. स्थानिक नागरिक धुळीच्या त्रासामुळे श्वसनाचे विकार, डोळ्यांचे आजार आणि त्वचारोगांना सामोरे जात आहेत. तसेच रुग्णवाहिकांना या रस्त्यावरून रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे आव्हानात्मक ठरत आहे. “जीवन-मरणाच्या संघर्षात एका मिनिटाचे महत्त्व असते, आणि या रस्त्यामुळे तोच वेळ निघून जातो,” असे स्थानिक नागरिक उद्विग्नपणे सांगतात.
ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरणासह संबंधित विभागांना अनेकवेळा लेखी निवेदनं दिली. प्रत्यक्ष भेटी घेतल्या; मात्र त्याचे कोणतेही परिणाम दिसून आले नाहीत. रस्ता दुरुस्तीचे आश्वासन मिळाले, पण प्रत्यक्षात कामाची सुरुवात झाली नाही. “दरवेळी आश्वासन आणि प्रत्यक्षात शून्य… आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये,” अशा शब्दांत ग्रामस्थांनी असंतोष व्यक्त केला आहे. “दि. २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत कडलासजवळील रस्त्याची दुरुस्ती प्रत्यक्ष सुरू न झाल्यास समस्त कडलास ग्रामस्थांच्या वतीने इंदापूर–विजापूर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल.” या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प होण्याची शक्यता असून, याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असेही ग्रामस्थांनी निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे.



