ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलशेतीवाडी
Trending

डिकसळचा पूल “माती”त

सांगोल्यात बांधकाम विभाग निद्रावस्थेत

Spread the love

सांगोला तालुक्यातील बांधकाम विभाग दगडगोट्यासारखा निगरगट्ट झाला आहे. हा विभाग कोणालाही जुमानत नाही. विशेष म्हणजे येथील अधिकारी म्हणवून घेणाऱ्या लोकांना कोणते रस्ते कुठे आहेत हेही माहित नाही. असे सर्व प्रकार होत असताना, तालुकावासियांना मात्र नाहक त्रास सोसावा लागत आहे.

सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या तऱ्हा सातत्याने चव्हाट्यावर येत आहेत. हा विभाग रस्त्यावर पाट्या टाकण्यात पटाईत आहे. घेरडी-जत रोडवरील डिकसळ फाट्यावरील पूल याच विभागाने पुन्हा मातीत घातला आहे.

सांगोला तालुक्यातील बांधकाम विभाग दगडगोट्यासारखा निगरगट्ट झाला आहे. हा विभाग कोणालाही जुमानत नाही. विशेष म्हणजे येथील अधिकारी म्हणवून घेणाऱ्या लोकांना कोणते रस्ते कुठे आहेत हेही माहित नाही. असे सर्व प्रकार होत असताना, तालुकावासियांना मात्र नाहक त्रास सोसावा लागत आहे.

निगरगट्टपणे वागणाऱ्या या विभागाला कोणाचा राजाश्रय आहे? हा सवाल उपस्थित होत आहे.

अख्खा सांगोला तालुका खड्ड्यात घालणारा सार्वजनिक बांधकाम विभाग असून अडचण नसून खोळंबा अशा स्थितीमध्ये आला आहे.

रस्त्याची चाळण
तालुकाभर रस्त्याची चाळण झाली आहे. सध्या या विभागाकडून जी खड्डे बुजविण्याचे मोहीम सुरू आहे, तीही “लाव लिजाम् टिमकी बजाव” याप्रमाणेच आहे. त्यामुळे ठेकेदार मंडळीही हे खड्ड्यातील रस्ते मातीत घालत आहेत. याबाबत उपअभियंत्याला वारंवार विचारले पण हे अधिकारी नुसते लोकांचे हाल पाहण्यात धन्यता मानतात.

जत मार्गावरील डिकसळ फाट्यावरील पूल हा गेली दहा वर्षापासून अंतिम घटिका मोजत आहे. याला कोणीच वाली नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार सांगितले. पण अधिकारी ऐकूनच घेत नाहीत. सध्या याच पुलावर चार फुटाचे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना खूपच कसरत करीत वाहने न्यावी लागत आहेत.

येथेच अनेक अपघात झाले असून कित्येकांना गंभीर जखमी व्हावे लागले आहे. गतवर्षी हाच पूल केवळ माती टाकून दुरुस्त करण्यात आला. आता तर या पुलाची प्रचंड दुरवस्था झाली असताना आताही पुन्हा माती टाकून हा पूल मातीत घालण्यात आला आहे.

तालुक्यातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. यातील काही ठिकाणी खड्डे बुजविण्याचा ठेका देण्यात आल्याचे सांगण्यात येते. पण हे ठेकेदारही खड्डे व्यवस्थित बुजवित नाहीत.

सध्या सांगोला तालुक्याला कोणीच वाली नाही अशी परिस्थिती आहे. अधिकारीही मनमानीप्रमाणे वागत आहेत. हे नेत्यांना दिसत नाही का? यासर्व बाबीवरून असे दिसते की सरकार आपल्या दारी,पण विकासनिधी सरकारी चोरांच्या घरी? पण हे असे किती दिवस चालणार असा सवाल विचारला जात आहे.

विरोधकही गप्प
सांगोला तालुक्यात लोकप्रतिनिधींचा धाक नाही. त्यामुळे कामचुकार अधिकारी आदर्श ठरीत आहेत. त्यामुळे जो तो अधिकारी माया गोळा करण्यात दंग आहे. यांना तालुक्याच्या विकासकामांचे काही देणेघेणे नाही. पण प्रबळ विरोध असलेलेही “हाताची घडी अन् तोंडावर बोट” ठेवून गप्प आहेत. जनता मात्र अशा खड्ड्यात तालुक्याचा विकास शोधताना दिसत आहे.

 

“शहाजीबापू तुम्ही पवारांवर टीका करू नका”

 

पाहा खास व्हिडिओ

 

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका