ताजे अपडेट
Trending

सांगोल्यात जुन्या झेडपी गटाप्रमाणेच निवडणूका

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा ज्वर वाढला

Spread the love

स्पेशल रिपोर्ट/ नाना हालंगडे
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्याने लवकर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होतील असे अपेक्षित आहे. तालुक्यात पूर्वीचे ७ जिल्हा परिषद गट व १४ पंचायत समिती गण आहेत. त्याप्रमाणेच निवडणुका होणार आहेत. याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. नाझरा गटाचे नाव बदलून चोपडी असे करण्यात आले आहे. पंचायत समिती गण उदनवाडीचे राजुरी गण अन् जुनोनी गणाचे नाव हातीद करण्यात आले आहे.

तालुक्यात सत्तेत असलेले शेकापचे आम.डॉ. बाबासाहेब देशमुख सत्कारात, शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील हे समारंभ व आजारात, शिवसेना ठाकरे गटाचे दीपकआबा साळुंखे पाटील हे पक्षांतराच्या विचारात, काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गट निराशात तर भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत हे सभासद नोंदणी कामानिमित्त जोशात असल्याचे दिसत आहे.

शेकापचे डॉ.बाबासाहेब देशमुख राजकारणात नवखे असले तरीही त्यांनी निवडणूक आल्यापासून तालुक्याच्या राजकारणात चांगला जम बसविला आहे.

शेकापची बांधणी वाडीवस्तीपर्यंत असल्याने व संघटन चांगले असल्याने, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी मागणी करणाऱ्या इच्छुकांची संख्या त्या पक्षात मोठ्या प्रमाणात आहे. आता तरी त्यांचे जवळचेच स्नेही ग्रामविकास मंत्री जीवनराव गोरे हे सोलापूरचे पालकमंत्री झाल्याने त्यांच्यासह कार्यकर्त्यात उत्साह दिसून येत आहे. विधानसभा निवडणूक प्रसंगी शेकाप हा महाविकास आघाडीचा मित्र पक्ष होता व महाराष्ट्राच्या सत्तेत विरोधी पक्षाची म्हणजेच महायुतीची सत्ता आली तरीही आमदार देशमुख यांनी अल्पावधीत भाजपाशी चांगले संबंध जोडल्याने विकासाची गंगोत्री बापूप्रमाणे चालू राहील अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसल्याने अद्याप तरी कोणाबरोबर जाण्याचा निर्णय त्या पक्षाने घेतला नाही. परंतु भाजपाशी जवळीक वाढण्याची शक्यता वाढली आहे. शेकाप मधील एक मोठा गट भाजपा बरोबरच जाण्याच्या तयारीत असून तशा प्रकारचा दबाव वाढत असल्याचे सध्यातरी दिसत आहे.

उबाठा गटाचे नेते दीपकआबा साळुंखे पाटील हे विधानसभा निवडणूक प्रसंगीच त्या पक्षात होते. त्यानंतर त्या पक्षाचे पूर्वीचे नेते व आबाला मानणारे कार्यकर्ते यांचं मनोमिलन झालेलं दिसून येत नाही. त्यामुळे आबा शिवसेना ठाकरे गटाला लवकरच सोडचिट्टी देऊन भाजपात जातील अशी सध्या तरी जोरदार चर्चा आहे. अद्याप तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात शांत जरी असले तरी गट बांधणी करण्यात प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.

शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी समारंभात सहभाग नोंदवत असल्याचे दिसत आहेत. हाता तोंडाशी आलेले मंत्रीपद विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने गमावले व पालकमंत्री पदाला मुकलेची खंत त्यांना वाटत आहे. तसे ते बोलूनही दाखवत आहे.आजारी नसते तर तिरंगी लढतीत सुद्धा बाजी मारली असती असे बापूसह कार्यकर्ते मत व्यक्त करीत आहेत. बापू हे पराभूत झाले असले तरी सध्या ते कार्यकर्त्यांची निराशा संपवून पुन्हा त्यांच्यात जोश निर्माण करण्यासाठी कार्यालयात येऊन बसून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. निवडणूक येतात जातात त्यापेक्षा कार्यकर्ता महत्त्वाचा आहे हे समजून ते कामाला लागलेले आहेत.

भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत हे स्वतः पक्षासाठी रस्त्यावर उतरून गावागावात जाऊन सभासद नोंदणी मोहीम जोमाने सुरू केले आहे. सांगोला शहरातसह ग्रामीण भागात एक लाख सभासद करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भाजपाची बांधणीला केदार-सावंत यांनी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा कसलेही परिस्थितीत फडकवण्याचा निर्धार करून कामाला लागलेले दिसून येत आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, अजित पवार गटाची तालुक्यात कार्यकारणी सुद्धा नाही. त्यामुळे त्या पक्षात सामसूम व निराशा दिसत आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका