मुलींच्या संघाने डीजेच बंद पाडला
डिकसळ आश्रमशाळेच्या मुलींच्या व्हॉलीबॉल संघाची पुण्यात दंगल

सांगोला/ नाना हालंगडे
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयांच्या वतीने भरविण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत गेली दशकापासून डिकसळ आश्रमशाळेचा दबदबा आजही कायम आहे. पण त्यावर अधिराज्य गाजविणाऱ्या पुणेस्थित मिलेनियम व्हॉलीबॉल संघाची मक्तेदारी मोडीत काढण्यात डिकसळ आश्रम शाळेच्या १४ वर्षीय मुलींच्या संघाने दर्जेदार खेळ करीत, सर्वांचीच मने या आश्रमशाळेच्या मुलींच्या संघांनी जिंकली.जरी निसटता पराभव झाला असला तरी, या मुलींच्या दिमाखदार खेळाने मिलेनियम संघाचा डीजे डिकसळच्या मुलींनी बंद पाडला अन् पुणे विभागात दुसरा क्रमांक पटकाविला.
तालुक्यातील डिकसळ आश्रम शाळेच्या व्हॉलीबॉल संघाची दरवर्षीच दर्जेदार कामगिरी होत आहे.या चालू वर्षी ही झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलींच्या १७ अन् १४ वर्षीय संघांनी अनुक्रमे दुसरा अन् तिसरा क्रमांक पटकाविला आहे. विभागात चर्चा असलेल्या पुणे स्थित संघालाही १४ वर्षीय मुलींच्या संघाने जेरीस आणले. मात्र उपस्थित सर्वांचीच मने याच मुलींच्या संघांनी जिंकली.

डिकसळ आश्रमशाळेच्या १४ वर्षीय मुलींच्या संघाने दर्जेदार खेळ करीत सेमिफायनलचे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले. हे सामने स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलाची पुरंदर हायकुल आणि ज्यू.कॉलेज येथे संपन्न झाले. यामध्ये अहमदनगर शहर आणि पुणे ग्रामीणच्या दोन्ही संघाला हरविले. त्यामुळे मुलींच्या याच संघाचा फायनल सामना पुणे शहर स्थित मिलेनियन संघाशी झाला. यावेळी मात्र पहिला सेट मिलेनियम जिंकला असला तरी दुसऱ्या सेटमध्ये डिकसळच्या संघाने दर्जेदार कामगिरी केली पण निसटता पराभव झाला.ज्या पुणे स्थित मिलेनियम संघाची कामगिरी पहिली तर,त्यांना दररोजचा दोन ते तीन तासांचा सराव,उत्तम कोचिंग,तर दर्जेदार आहार.तर त्यांच्या दिमतीला त्यांचे पालक असतात.कालही असेच पहावयास मिळाले. त्यांनाही आपल्याच संघाची भीती पण निसटता पराभव झाल्याने याच मिलेनियम संघाने आणलेला डीजे वाजविला नाही.त्यांना ही आपले यश समजले.
याच डिकसळ आश्रम शाळेतील पल्लवी क्षीरसागर, प्राजक्ता हालंगडे, संध्या क्षीरसागर, दिपाली गोरड, अंकिता साळुंखे, पल्लवी मुंजे, संस्कृती करांडे,स्नेहल मागाडे,कल्याणी गाडे यांनी दमदार अन् जिगरबाज खेळी करीत सर्वांकडून वाह व्वा मिळविली.पुणे विभागात दुसरा क्रमांक पटकाविला. याच आश्रम शाळेच्या मुलींच्या संघाने पुणे विभागात दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकाविल्याने यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
वर्षाची टीम जिगरबाज
पुणे विभागात दंगल करणाऱ्या डिकसळ आश्रमशाळेच्या १४ वर्षीय मुलींच्या व्हॉलीबॉल टीमने नेत्रदीपक कामगिरी करीत विभागात दुसरा क्रमांक मिळविला.पण हा निसटता विजय विजयी टीमसाठी पराजित सारखाच म्हणावा लागेल, हे त्यांनी ही मान्य केले. त्यांनी यासाठी मोठ्या प्रमाणात लवाजमाही गोळा केला होता. पण आपल्याच १४ वर्षीय मुलींच्या संघाच्या जिगरबाज खेळाची उपस्थितांची मने जिंकली.
आश्रमशाळा विभागात चर्चेची
आज तालुक्यातील डिकसळ येथील आश्रम शाळेचा सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर पुणे विभागात दबदबा आहे. येथील मुलींच्या संघाची दरवर्षी दमदार कामगिरी याचा आलेख वाढवीत आहे. त्यातच क्रीडा शिक्षक भारत यादव,काका करांडे सरांचे उत्तम खेळाचे धडे यांच्यामध्ये नवचेतना निर्माण करीत आहेत. काल झालेल्या अटीतटीच्या सामन्यातही याच प्रशालेच्या मुलीने जिगरबाज खेळी करीत विभागात उत्तम खेळाची प्रचिती दिली.



