थिंक टँक स्पेशल

बाबासाहेबांच्या विचारांचे संदर्भमूल्य

श्रीरंजन आवटे यांचा मार्मिक लेख

Spread the love

‘कायद्याचं राज्य’ ही संकल्पना त्यांना अतिशय महत्वाची वाटत होती. संवैधानिक संस्थात्मक मार्गांचा वापर करण्यावर त्यांनी भर दिला. संवैधानिक नैतिकतेची चौकट बाबासाहेबांनी आखून दिली.

कोणत्याही महामानवाच्या जयंत्या मयंत्यांच्या वेळी सेलिब्रेशनच्या पलीकडं त्यांचा विचार समजावून घेणं, अधिक महत्वाचं. विशेषतः आज त्या विचारांचं संदर्भमूल्य लक्षात घेणं अधिक जरुरीचं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आज संदर्भमूल्य काय आहे? साधारणपणे खालील मुद्यांमधून हे संदर्भमूल्य लक्षात येऊ शकेल:

१. ‘हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरणार नाही’, असं म्हणणारे बाबासाहेब हिंदुत्ववादी नाहीत उलटपक्षी हिंदुत्ववादी राजकारणाचे ते कट्टर विरोधक आहेत.

२. विभूतीपूजा हा भारतीय समाजाला जडलेला रोग आहे, यातून लोकशाहीचे अधःपतन होईल, असा इशारा देणारे बाबासाहेब हुकूमशाहीला, एकाधिकारशाहीला सुस्पष्ट नकार देतात.

३. बहुसंख्यांकवादी राजकारणातून लोकशाही धोक्यात येईल, असं सांगणारे बाबासाहेब सर्वसमावेशक लोकशाहीचे पुरस्कर्ते आहेत. जमातवादी राजकारणाचे विरोधक आहेत आणि धर्मनिरपेक्षतेचे समर्थक आहेत.

४. स्वातंत्र्य आणि समता ही दोन्ही मूल्ये एकमेकांच्या विरोधात नाहीत. त्यांचं सहअस्तित्व जरुरीचं आहे आणि त्यांना बंधुतेपासून वेगळं करता येणार नाही. या तिन्हीपैकी एखादं मूल्य नसेल तर लोकशाहीचा पराभव अटळ आहे, असं बाबासाहेबांचं मत होतं.

५. संविधान सभेतील शेवटच्या भाषणात बाबासाहेब म्हणतात: उद्यापासून आपण एका विरोधाभासाच्या जगात प्रवेश करणार आहोत, जिथं राजकीय लोकशाही (एक व्यक्ती,एक मत आणि एक मत, एक मूल्य असं तत्त्व रुजलेलं असेल) पण आर्थिक आणि सामाजिक लोकशाही नसेल.
आर्थिक आणि सामाजिक आयामांसह लोकशाही परिपूर्ण होईल.

६. सामाजिक न्यायाचा पायाच बाबासाहेबांनी घातला. भेदभाव,विषमता यांचा सांगोपांग अभ्यास करून बाबासाहेबांनी ही मांडणी केली.

७.
अ) स्त्री ही जातसंस्थेचं प्रवेशद्वार आहे.
ब) सर्व स्त्रिया दलित आहेत.
क) एखाद्या देशाची प्रगती मोजायची असेल तर त्या देशातील स्त्रियांचा किती विकास झाला आहे, हा मापदंड मला महत्वाचा वाटतो.

वरील तिन्ही विधाने बाबासाहेबांची आहेत. यातून जात-लिंगभाव-धर्मसंस्था याबाबतची मांडणी लक्षात येऊ शकते.

८. बाबासाहेबांच्या एकूण मांडणीत अहिंसेला महत्वाचं स्थान आहे. बौद्ध धर्म स्वीकारतानाही बाबासाहेब अहिंसेचं मोल अधोरेखित करतात त्यामुळं हिंसक राजकारणाला त्यांचा थेट विरोध आहे.

९. असहमती व्यक्त करण्याचा अवकाश लोकशाहीत असला पाहिजे, याविषयी बाबासाहेब आग्रही होते.

१०. ‘कायद्याचं राज्य’ ही संकल्पना त्यांना अतिशय महत्वाची वाटत होती. संवैधानिक संस्थात्मक मार्गांचा वापर करण्यावर त्यांनी भर दिला. संवैधानिक नैतिकतेची चौकट बाबासाहेबांनी आखून दिली.

– श्रीरंजन आवटे, पुणे

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका