
पीकपाणी वार्तापत्र / नाना हालंगडे
सांगोला तालुक्यात मागील चार ते पाच दिवसांपासून झालेल्या मध्यम ते हलक्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. मागील काही आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, मात्र सध्या पावसामुळे सुमारे 29 हजार 608 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.
तालुक्यात खरीप पिकाचे सरासरी 30 हजार 648.84 हेक्टर क्षेत्र आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे 29 हजार 608.03 एवढ्या मोठ्या प्रमाणात खरीपाच्या पेरण्या झाल्या होत्या. विशेषतः मका पिकाची 18 हजार 531 हेक्टरवर पेरणी झाली आहे. मात्र, पेरणीनंतर पाऊस खंडित झाल्याने अनेक भागांतील पिके माना टाकू लागली होती. पाण्याअभावी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले होते.
मात्र मागील पाच दिवसापासून ढगाळ वातावरणात अनेक ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांना जीवदानच मिळाले आहे. तालुक्यात पाच दिवसांत तालुक्यात 62.8 मिमी पाऊस झाल्याने पिकांना नवे बळ मिळाले आहे. त्यामुळे मका, बाजरी, ज्वारी यासारखी पिकांची चांगली वाढ होणार आहे. पावसामुळे जमिनीत ओल निर्माण झाल्याने पिकांचे वाढीचे टप्पे सुरळीतपणे सुरू झाले आहेत.
पाणी वाढीसाठी जोरदार पावसाची गरज
सध्या तालुक्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झालेला नाही. अनेक गावांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. परिणामी शेतकरी अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा करत आहेत. सध्या दिवसभर ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसामुळे पिकांची स्थिती सुधारत आहे. शेतकऱ्यांना आता नियमित आणि व्यापक पावसाची गरज आहे, जेणेकरून खरीप हंगाम यशस्वीपणे पार पडेल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार लवकरच पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. विहिरी, विंधन विहिरींला पाणी वाढण्यासाठी अजून जोरदार पावसाची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
तालुक्यातील पीकनिहाय खरीप पेरणी अहवाल
पिकाचे नाव – सरासरी क्षेत्र – पेरणी क्षेत्र – टक्केवारी (हेक्टरमध्ये)
बाजरी – 17672.48 – 8621 – 48.78
मका – 9863.40 – 18531 – 188.43
तुर – 664.02 – 871 – 131.17
उडीद – 318.64 – 451.20 – 141.60
मुग – 180.78 – 146.40 – 80.98
भूईमूग – 286.36 – 317.50 – 110.87
सूर्यफूल – 1520.46 – 588.90 – 38.73
एकूण – 30648.84 – 29608.03 – 96.60
तालुक्यात मंडलनिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
मंडलाचे नाव – एकूण पाऊस – टक्केवारी – पावसाचे दिवस
सांगोला – 46.8 – 64.3 – 5
शिवणे – 65.3 – 89.7 – 6
जवळा – 29.1 – 40.0 – 5
हातीद – 51.8 – 71.2 – 4
सोनंद – 28.04 – 39.00 – 5
महूद – 41.1 – 56.5 – 4
कोळा – 19.4 – 26.6 – 3
नाझरे – 49.3 – 67.7 – 4
संगेवाडी – 79.0 – 108.5 – 4
एकूण – 45.7 – 62.8 – 5



