म्हैसाळ योजनेतून सांगोला तालुक्यातील शेवटच्या गावांना पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करा
आ.डॉ. बाबासाहेब देशमुखांची अधिवेशनात आग्रही मागणी

नागपूर : प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील 8 गावे म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत येत असून सांगोला तालुक्याचा काही भाग म्हैसाळ योजनेच्या शेवटी येत असल्याने या गावांना या योजनेतून पाणी पुरवठा अतिशय कमी दाबाने होतो. परिणामी शेतकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. याचा मोठा फटका तेथील शेतकऱ्यांना बसत आहे. पाण्याबाबतचा हा अतिशय महत्वाचा प्रश्न आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडला. या गावांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यावर उत्तर देताना लवकरच योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.
आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी अधिवेशनात मांडलेले मुद्दे
सांगोला तालुक्यातील 8 गावे म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत येत असून सांगोला तालुक्याचा काही भाग म्हैसाळ योजनेच्या शेवटी येत असल्याने पाणी पुरवठा अतिशय कमी दाबाने होत असल्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. सांगोला तालुका हा राज्यातील कायम दुष्काळग्रस्त व पाणीटंचाईचा सामना करणारा तालुका असून येथे पर्जन्यमान कमी असल्याने शेती व पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त स्त्रोतांचा नेहमीच अभाव जाणवतो. म्हैसाळ योजनेद्वारे कोरडा नदी व त्यावरील बंधारे भरून देण्याकरीता अंदाजित ३.०० दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्यकता असून जत कालव्यातून पाणी बंदिस्त नालिकेद्वारे देण्याची तरतूद झाल्यास तेथील गावांना पिण्याचे पाणी, शेतीसाठी व पशुधनासाठी लागणाऱ्या पाण्याची कमतरता नष्ट होऊ शकते, सदर योजनेतून कोरडा नदीवरील १५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बंदिस्त पाईपलाईनद्वारे म्हैसाळ योजनेच्या जत कालव्यावरून पाणी देण्याची तरतूद करण्यात येणार आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या गावांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल, असे सांगितले. आगलावेवाडी को.प.बंधाऱ्यापासून वाढेगावपर्यंत कोरड्या नाल्यातील एकूण १५ को.प.बंधाऱ्यामध्ये जत मुख्य कालव्यामधून थेट बंदिस्त नलिका वितरण करुन पाणी सोडण्याच्या प्राथमिक अहवालाची कार्यवाही क्षेत्रिय स्तरावर सुरू असल्याचे सांगितले.
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे काही भागांना पाणी मिळत असले तरी मौजे डिकसळ येथील काही भाग अजूनही पाणीटंचाईने त्रस्त आहे, तो मुद्दाही आ. देशमुख यांनी सभागृहात मांडला. सांगोला तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्प अंतर्गत पारे, नराळे, हंगीरगे, डिकसळ, गावडेवाडी, घेरडी, सोनंद व हबिसेवाडी ही 8 गावे येत असून या गावांना सिंचन करिता पाणी पुरवठा अतिशय कमी दाबाने होत असल्याने शेतकऱ्याना पुरेसे पाणी उपलब्ध होत नसून, शेतकऱ्याना शेती साठी मुबलक पाणीपुरवठा करण्याकरिता 2 TMC पाण्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी केली.
आगलावेवाडीपासून वाढेगावपर्यंत कोरडा नदीवरील एकूण 15 कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये जत मुख्य कालव्यामधून थेट बंदिस्त नलिका वितरण करून पाणी सोडण्याच्या प्राथमिक अहवालाची कार्यवाही किती कालावधीत पूर्ण करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी किती कालावधी लागेल? असा प्रश्न आ. डॉ .बाबासाहेब देशमुख यांनी विचारला. कृष्णा कोयना उपसा सिंचन योजनेच्या ५ व्या सुधारीत प्रशासकीय मान्यता अहवालात सांगली व सोलापूर जिल्ह्यातील साठवण व लघु पाट बंधारे तलावात अंशतः पाणी देण्याची 1 TMC पाण्याची तरतूद केली आहे, सदर तरतूद अपुरी असून ती वाढविण्यात यावी, अशी मागणी केली.
नराळे, हंगिरगे येथील साठवण तलावात अंशतः 15 ते 20 टक्के प्रस्तावित असून क्षेत्रीय स्तरावरील कार्यवाही पूर्ण करून पाणी किती कालावधीत सोडण्यात येईल? असा सवाल उपस्थित केला. मौजे डिकसळ गावातील 627 हेक्टर क्षेत्र लाभ क्षेत्रात समाविष्ट केले असून उर्वरित 1234.22 हेक्टरसाठी पाण्याची तरतूद करून या क्षेत्राचा म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत समावेश करावा, अशी मागणी केली.
म्हैसाळच्या पाचव्या सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये जत तालुक्यातील वंचित गावांना 5 टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले आहे. तसेच टेंभू योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये 8 टीएमसी पाणीवाटपाद्वारे पूर्वीच्या तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी तालुक्याच्या लाभक्षेत्रालगतच्या वंचित गावाचा फायदा देण्यात आला आहे. परंतु म्हैसाळ योजनेच्या पाचव्या सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये सांगोला व मंगळवेढा तालुक्याचा विचार करण्यात आलेला नाही. सांगोला तालुक्यातील म्हैसाळच्या लाभक्षेत्रालगतच्या गावातील बळीराजाकडून पाण्याची मागणी वाढत असून कोरडा नदी व उपरोक्त गावांना अतिरिक्त 2 टीएमसी पाण्याची तरतूद करावी, अशी मागणी आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
कृष्णा पाणी लवादामध्ये प्रथम तरतूद असलेले 594 टीएमसी पाण्यापैकी साधारणपणे 50 टीएमसी पाणी शिल्लक असते त्यातून किमान पाच टीएमसी पाण्याची तरतूद सांगोला व मंगळवेढा तालुक्यासाठी करावी अशी मागणी आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी अधिवेशनात केली आहे.
यावर उत्तर देताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या गावांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल, असे सांगितले. आगलावेवाडी को.प.बंधाऱ्यापासून वाढेगावपर्यंत कोरड्या नाल्यातील एकूण १५ को.प.बंधाऱ्यामध्ये जत मुख्य कालव्यामधून थेट बंदिस्त नलिका वितरण करुन पाणी सोडण्याच्या प्राथमिक अहवालाची कार्यवाही क्षेत्रिय स्तरावर सुरू असल्याचे सांगितले. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे सांगोला तालुक्यातील लाभक्षेत्रातील ८ गावांतील ४००० हे. क्षेत्रास सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मौजे डिकसळ येथील ६२७ हे. इतके क्षेत्र लाभक्षेत्रात समाविष्ट असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले आहे.
अधिवेशनातील भाषणे



