
स्पेशल रिपोर्ट/ डॉ.नाना हालंगडे
सांगोला नगरपालिका निवडणुकीत आगळीवेगळी युती पहावयास मिळाली. यात भाजपाने जोर का झटका देत शेकापने जाहीर केलेला उमेदवार ऐनवेळेस आपल्या पक्षात घेत उमेदवारी अर्जही भरण्यास लावला. सांगोल्यात भाजपाने जोर का झटका दिला असेच पहावयास मिळाले आहे.
तब्बल नऊ वर्षांनी निवडणूक होत असताना सांगोला तालुक्यात अभद्र युती झाली असल्याचे जनतेतून बोलले जात आहे. यात प्रामुख्याने शेकाप, भाजप, राष्ट्रवादी, दीपक आबा गट व् उबाठा गट एकत्र येत या निवडणुकीच्या सामोरे जात आहेत. तर दुसरीकडे शहाजीबापू गट अशी दुरंगी निवडणूक येथे होणार आहे. असे सर्व असले तरी विद्यमान खासदार कोणाचा प्रचार करणार हे मात्र समजू शकले नाही. मागील आठ दिवसांपासून या निवडणुकीचा रणसंग्राम गाजू लागला आहे. २ डिसेंबर रोजी मतदान आहे. सोमवार १७ नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपलेली आहे.
भाजपा पहिल्यांदाच अग्रस्थानी
सांगोला नगरपालिकेच्या इतिहासात भाजपा पहिल्यांदाच अग्रस्थानी असल्याचे पहावयास मिळाले. आतापर्यंत यांचा साधा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. तरीही देशात,राज्यात यांच्याकडे सत्तास्थाने असल्याने भाजपाने सर्वानाच जोर का धका दिलेला आहे. थेट नगराध्यक्ष पदासाठी हात घातला आहे. अन् तोही चक्क कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहे.
कसा असेल फॉर्म्युला?
सांगोल्यात कमळाचा वरचष्माच राहणार आहे. एक नगराध्यक्ष व एक नगरसेवक पद मिळेल. शेकापासाठी १३ जागा तर दिपकाआबा गटाला ८ जागा असा यांचा फॉर्म्युला असल्याचे समजते. स्वतंत्र निवडणूक लढविणाऱ्या बापू गटाकडून २३ उमेदवार हे धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढविणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेस तथा झपके गटाकडून नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी असे ११ अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत.
सांगोल्याच्या इतिहास हे असे पहिल्यांदाच घडले आहे. याच निवडणुकीचा राडा मिटविण्यासाठी पालकमंत्री यांना यावे लागले. ते भटजी म्हणून आले, अन् दुपारी १२:३० वाजता लग्न लावून गेले. त्यावेळी माजी आमदार अन्य काही लोकप्रतिनिधी तर विद्यमान आमदार दुसऱ्या खोलीत होते. त्यानंतर दुपारी १:३० अधिकृत एबी फॉर्म घेवून एक कुरुला आला. याचीच चर्चा सांगोल्यात रंगत होती. एक मात्र दुपारनंतर सांगोल्यात या घडलेल्या प्रकारानंतर बापूंच्या गटाची मात्र जोरदार चर्चा होती.
विद्यमान लोकप्रतिनिधी दुसऱ्या खोलीत
हा पक्ष प्रवेशाचा सोहळा सांगोल्यात रंगत असताना विद्यमान आमदार दुसऱ्या खोलीत बसले होते. त्याच दरम्यान समोर पालकमंत्री, भाजपचे पदाधिकारी,माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील व् माळी समाज बांधव यावेळी उपस्थित होते.



