थिंक टँक स्पेशल
Trending

“इच्छुकांनो, अपक्ष फॉर्म भरा, कोणाचाही दबाव येणार नाही”

डॉ. अनिकेत देशमुखांच्या पोस्टने खळबळ

Spread the love

“इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त अपक्ष फॉर्म भरावेत. प्रत्येकाला उभारण्याची संधी मिळेल. आणि कोणाला कोणाचा दबाव येणार नाही.” अशा आशयाची पोस्ट त्यांनी इंस्टाग्राम, फेसबुक या सोशल मीडियावर केली आहे.

सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे
शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस मंडळाचे सदस्य तथा युवा नेते डॉ. अनिकेत देशमुख यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच सांगोला तालुक्यात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या “सांगोला पॉलिटिक्स” या युट्यूब चॅनलवर डॉ. अनिकेत देशमुख यांनी एक खळबळजनक मुलाखत दिली होती. आता त्यानंतर पुन्हा त्यांनी सोशल मीडियावर एक महत्वाची पोस्ट टाकल्यामुळे पुन्हा एकदा सांगोल्याचे राजकीय वातावरण तापलं आहे.

“इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त अपक्ष फॉर्म भरावेत. प्रत्येकाला उभारण्याची संधी मिळेल. आणि कोणाला कोणाचा दबाव येणार नाही.” अशा आशयाची पोस्ट त्यांनी इंस्टाग्राम, फेसबुक या सोशल मीडियावर केली आहे.

डॉ. अनिकेत देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे तरुण नेते आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग सांगोला तालुक्यात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाई गणपतराव देशमुख यांनी आपल्या हयातीतच डॉ. अनिकेत देशमुख यांना विधानसभेचे उमेदवार घोषित केले होते. माझ्यानंतर डॉ. अनिकेत देशमुख हे शेकापचे नेते असतील, असे सांगत भाई गणपतराव देशमुख यांनी त्यावेळेस एक अर्थाने डॉ. अनिकेत देशमुख यांना आपला राजकीय वारसदार घोषित केल्याची चर्चा होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनिकेत देशमुख यांचा अगदी थोड्या मतांनी पराभव झाला होता. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. अनिकेत देशमुख हे प्रबळ दावेदार असताना त्यांना डावलण्यात आले होते.

दरम्यान मागील वर्षभराच्या काळात विद्यमान आमदार आणि डॉ. अनिकेत देशमुख यांच्यातील शीतयुद्ध सातत्याने सोशल मीडियावर घडत असताना दिसत होतं. यावर आडपडद्याने दोन्ही बाजूने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या टीका टिप्पणी होताना दिसत होती. मागील दहा दिवसांपूर्वी सांगोला तालुक्यात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या “सांगोला पॉलिटिक्स” या युट्यूब चॅनलवर डॉ. अनिकेत देशमुख यांनी एक खळबळजनक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत डॉ. अनिकेत देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षातील अंतर्गत वादावर अनेक मोठे गौप्यस्फोट केले होते. या मुलाखतीत त्यांनी पक्षामध्ये आपल्याला डावले जात असल्याची भूमिका स्पष्टपणे मांडली होती. पक्षाचे महत्त्वाचे निर्णय, कार्यक्रम किंवा बैठकांना आपल्याला मुद्दामहून बोलवले जात नसल्याचे त्यांनी सांगितले होते.

अनेकांना मुलाखत रुचली नाही
ही मुलाखत व्हायरल होताच सांगोला तालुक्यात खळबळ उडाली होती. ही मुलाखत पक्षातील नेतेमंडळींना रुचली नाही. काहीजणांनी वेगवेगळ्या मार्गाने संपादकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र दबावाला झुगारून ही मुलाखत तुफान व्हायरल झाली. बाहेरील पक्षातील नेत्यांबाबत वस्तुस्थितीजन्य आणि प्रसंगी न रुचणारी बातमी प्रसिद्ध झाल्यास नेत्यांना आनंद होतो. मात्र, आपल्याच पक्षातील सत्यस्थिती समोर आल्यास ते रुचत नाही. खरे तर पत्रकारितेला आरसा समजला जातो. जे घडते ते जसे आहे तसे मांडणे हा पत्रकारितेचा धर्म असतो. मात्र हा अलिखित संकेत अनेकांना रुचत नाही. स्वतःचे कौतुक व्हावे अशाच बातम्या माध्यमातून याव्यात, इतर गोष्टींवर कोणी बोलू नये, लिहू नये हा होरा मनात बाळगून काहीजण राजकारणात यशस्वी व्हायचा प्रयत्न करतात. मात्र लोकशाही मानणाऱ्या या देशात तसे घडणे शक्य नाही. जे आहे ते कोणी ना कोणी बोलणार आणि मांडणारच.

दबावाच्या राजकारणात कार्यकर्त्यांची गोची
सांगोला नगर परिषदेच्या निमित्ताने सांगोला शहराचे राजकारण सध्या ढवळून निघताना दिसत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाही अजूनही सांगोला तालुक्यातील जुन्या पक्षासह इतर पक्षांचे उमेदवारी अर्ज अजूनही दाखल झालेले नाहीत. राजकीय साट्या-लोट्याच्या राजकारणात डाव साधून एनकेन प्रकारे सत्तेच्या खुर्चीचे वाटेकरी व्हावे असे सर्वांनाच वाटत आहे.

काहीजण राज्य पातळीवरील बलाढ्य पक्षाच्या दबावाखाली शरणागता सारखे वागत आहेत. या राजकीय साटेमारीच्या खेळात निष्ठावान इच्छुक उमेदवारांचे मनसुबे मात्र नेत्यांकडूनच धुळीला मिळवले जात आहेत. ज्याच्याकडे बक्कळ पैसा आहे तोच उमेदवार निवडून येऊ शकतो असा भाबडा आशावाद काही जणांच्या मनात आहे.

अशातच डॉ. अनिकेत देशमुख यांनी पुन्हा सोशल मीडियावर एक महत्वाची पोस्ट टाकल्यामुळे पुन्हा एकदा सांगोल्याचे राजकीय वातावरण तापले आहे. ज्या इच्छुक उमेदवारांना निवडणूक लढवायची आहे, मात्र त्यांना संधी मिळत नाहीये अशांनी जास्तीत जास्त अपक्ष म्हणून फार्म भरावेत. अपक्ष फॉर्म भरले तर कोणाचाही दबाव राहणार नाही असाच संदेश डॉ. अनिकेत देशमुख यांना या पोस्टमधून द्यायचा असावा असे स्पष्ट होते.

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत डॉ. अनिकेत देशमुख यांनी “पक्षाने आपल्याला या निवडणुकीत विश्वासात न घेतल्यास स्वतंत्र विचार करू, स्वतंत्रपणे पर्यायी व उमेदवार दिले जातील” असा इशारा दिला होता. अशातच त्यांनी ही पोस्ट केल्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. डॉक्टर अनिकेत देशमुख हे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी बंडखोर भूमिकेतून नाराज इच्छुक उमेदवारांना बळ देणार का? याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. डॉ. अनिकेत देशमुख यांनी जर अशी भूमिका घेतली तर तालुक्यात नव्या समीकरणाची नांदी ठरेल हे मात्र नक्की.

डॉ. अनिकेत देशमुख यांची खळबळजनक मुलाखत 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका