भारतीयत्वाची आदिम सभ्यता सांगणारा “भिनवाडा”

बाळासाहेब कांबळे लिखित ग्रंथावरील डॉ. रवींद्र श्रावस्ती यांचे मर्मग्राही विवेचन

Spread the love

जावळीच्या दुर्गम डोंगराळ भागात शिक्षकी पेशाच्या निमित्ताने एक दुष्काळी भागातील तरुण शिक्षणाचे नवे स्वप्न घेऊन येतो. येथील डोंगर – दऱ्या झाडे – झुडपे नदी किनार यामुळे तो आनंदून जातो. पण येथील जगण्यातील भौगोलिक सामाजिक, राजकीय संघर्षामुळे त्याची घुसमट होत राहते. हे या कादंबरीतून मांडण्यात आले आहे.

एक संवेदनशील माणूस, परिवर्तनवादी ध्येयनिष्ठ शिक्षक, आंबेडकरी बाण्याचा पत्रकार, प्रसिद्ध लेखक अशा अनेक बिरूदावलींनी संपन्न असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळासाहेब कांबळे. खटाव-माण या कमी पाण्याच्या भूमीतून उगवलेला हा माणूस सच्चेपणाच्या सद्गुणांच्या अनेक पानांफुलांनी डवरलेला आहे.

एखाद्या लेखकाने, नवोदित कवीने काही लिहिले तर त्या पुस्तकावर आपल्या मोत्यासारख्या सुंदरअक्षरांनी लिहिणारा हा साहित्यवेडा रसिक आहे. पत्राद्वारे ते आपले म्हणणे आवर्जून कळवत असतात ‘भिनवाडा’ या आज चर्चेत असणाऱ्या कादंबरीच्या निर्मितीमुळे कादंबरीकार म्हणून नव्या दमदार रूपात ते आपणासमोर आले आहेत. जावळीच्या दुर्गम डोंगराळ भागात शिक्षकी पेशाच्या निमित्ताने एक दुष्काळी भागातील तरुण शिक्षणाचे नवे स्वप्न घेऊन येतो. येथील डोंगर – दऱ्या झाडे – झुडपे नदी किनार यामुळे तो आनंदून जातो. पण येथील जगण्यातील भौगोलिक सामाजिक, राजकीय संघर्षामुळे त्याची घुसमट होत राहते. हे या कादंबरीतून मांडण्यात आले आहे.

शिवसागर जलाशयामुळे या भागातील जनजीवन विस्थापित बनले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डोंगर कपारीत राहून खडतर जीवन जगणे इथल्या भूमिपुत्रांना नित्याचेच झाले आहे. याचाच भाग बनलेल्या विश्वासला येथील लोकांची जगण्याची परिभाषा, संस्कृती, बोलीभाषा, सण – उत्सव जवळून पाहता येतात. शिवाय येथील अनेक लोकवैशिष्ट्यामुळे देशभाग आणि कोकण यामधल्या पट्ट्यातील अनाम जगणे या कादंबरीतून उलगडत राहते. म्हणून हे लेखन निश्चितच लक्षणीय ठरले आहे.

कादंबरीचे लेखक आंबेडकरी चळवळीतून वा वंचित घटकातून आलेले असले तरी त्यांच्या या साहित्यकृतीला दलित साहित्याच्या पारंपरिक परिभाषेतून पाहता येणार नाही. मानवी संवेदना मानवी दुःख हे मानवीयच असतात म्हणून जात, धर्म, लिंग यातून त्यांचे पदर बदलत असतात. त्यांची दाहकता कालानुरूप बदलत राहत असते.

या समग्र कादंबरीतून मात्र नायकाचे दलितपण अव्यक्तच राहत असले तरी ते शिक्षक माणूस या सीमारेषेवर अधिक व्यक्त होते. त्यामुळे ही कादंबरी माणूस म्हणूनच संवेदना मांडते. त्यातील दलितत्व विरून जाऊन एका ध्येयवादी शिक्षकाचे मनुष्यत्व , विभिन्न दुःखाशी तादात्म्य पावून यावरच प्रकाशझोत टाकत राहते. हेच या कादंबरीचे निर्विवाद यश आहे. मराठी साहित्यात कदाचित हा भूभाग, या परिसरातील लोकजीवन, त्यांचे सांस्कृतिक जगणे दुर्लक्षित राहिले असले तरी या लोकांचे अनाम जगणे भारतीय आदिम सभ्यता सांगणारे आहे हे नक्की.

लेखक बाळासाहेब कांबळे म्हणजे माणदेशी माणूस. तिथल्या रूक्ष निसर्गाच्या कचाट्यात बालपण, तरूणपण घालवूनही निसर्गाने फुललेल्या कोकणात त्यांच्याच रंगाने, तिथल्या पावसाने चिंब भिजून तेथील माणसांच्या भाषेत, त्यांच्या नेमक्या देहबोलीत हा लेखक लिहितो. तिथल्या प्रतिमा, तिथले विशिष्ट शब्द, तिथला परिसर, तिथली आदिम सभ्यता नेमक्या शब्दांत पकडतो. यास दाद दिली पाहिजे.

या कादंबरीत अस्पष्टपणे दृग्गोचर होणारी आणखी एक लखलखीत गोष्ट म्हणजे कादंबरी ज्या परिसरात घडते त्या परिसरातील सामान्य माणसांच्या हृदयांत, मस्तिष्कांत रूजलेली या देशाची मूळची आदिम सभ्यता! गणराज्य सभ्यतेचा संस्कार अजूनही इथल्या राबणाऱ्या बहुजनांत आहे. ही बाब कादंबरी आपणासमोर मांडते. आजच्या लोकशाहीचा हा आदिम अविष्कार अजूनही इथल्या बहुजनांत जिवंत आहे. पण त्याला इथल्या बहुजनांतूनच पुढे आलेल्या विघातक भांडवलदारी वृत्तीच्या लोकांपासून धोका निर्माण झाला आहे, हे सत्यही इथे स्पष्ट होते.

अगदी मर्यादित पानांची असणारी ही कादंबरी पण या कादंबरीचा व्यक्त अव्यक्त पसारा फार मोठा आहे . म्हणून प्रत्येकाने ही कादंबरी आवर्जून वाचलीच पाहिजे.
                                   – डॉ. रवींद्र श्रावस्ती, सांगली

  • भिनवाडा (कादंबरी)
  • लेखक : बाळासाहेब कांबळे
  • प्रकाशक : राकेश साळुंखे
  • लोकायत प्रकाशन, सातारा
  • Mob: 8484977899

भिनवाडा या कादंबरीचे लेखक बाळासाहेब गोपाळ कांबळे हे मूळचे मायणी ता. खटाव, जि. सातारा येथील आहेत. त्यांचे शिक्षण एम. ए., डी. एड. , बी. जे. , डी. एस. एम. असे झाले आहे. मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रम, वृत्तपत्र पदविका परीक्षेत त्यांनी टिळक महाराष्ट्र मुक्त विद्यापिठात प्रथम क्रमांक पटकावला. कविता व निबंध लेखनाची जिल्हा व राज्यस्तरीय पारितोषिके प्राप्त. महाराष्ट्र साहित्य पत्रिका, अक्षर वैदर्भी, परिवर्तनाचा वाटसरू, शिल्पकार, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, सत्यसह्याद्री मुक्तागिरी अशा विविध नियतकालिके व वर्तमानपत्रात समीक्षा व लेख प्रकाशित. प्रकाशित पुस्तके : असे घडले महापुरुष, सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले, रमाई चरित्र (मराठी आवृत्ती कन्नड भाषेत अनुवादित), याशिवाय त्यांनी क्रांतिपर्व या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांकाचे संपादन केले आहे. समता सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान सेलू , परभणी कथा रत्न पुरस्कार 2010, आझाद बहुउद्देशीय विकास संस्था वाई कृष्णा ‘ साहित्य गौरव पुरस्कार 2011, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समिती सांगली साहित्यरत्न ‘पुरस्कार 2016, आदर्श शिक्षक’ पुरस्कार 2018, पं . स . खटाव (वडूज), बहुजन शिक्षक संघ सातारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2019 असे पुरस्कारही मिळाले आहेत.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका