पुरोगामी युवक संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब देशमुख यांची निवड

डॉ. अनिकेत देशमुख शेकापच्या मध्यवर्ती समितीवर

Spread the love

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्यातील युवा नेते तथा स्व. भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांची पुरोगामी युवक संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अलिबाग येथे झालेल्या परिषदेत ही निवड करण्यात आली. सोबतच डॉ. अनिकेत देशमुख यांची शेकापच्या मध्यवर्ती समितीवर निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे सांगोला तालुक्यातील शेकाप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

अलिबाग येथे आयोजित शेकापचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. भाई आ. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा झाला. यावेळी भाई चंद्रकांत देशमुख यांच्यासह शेकापचे वरीष्ठ नेते या मेळाव्यास उपस्थित होते. त्यावेळी या निवडी करण्यात आल्या. या मेळाव्यास सांगोला येथून शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

सांगोला तालुका सरचिटणीसपदी दादासाहेब बाबर यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर सांगोल्यात शेकाप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एकनिष्ठता, तत्वनिष्ठा जोपासून सर्वाधिकवेळा आमदार बनून विक्रम स्थापित केलेले आ.भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेतकरी कामगार पक्षाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी “प्रती आबासाहेब” बनून कामाचा धडाका सुरू केला आहे. त्यांचे चाहते हे “बाबासाहेब, तुम्हीच आहात आमचे आबासाहेब” हे घोषवाक्य समाजमनात रुजवताना दिसत आहेत.

डॉ. बाबासाहेबांची साधी राहणी
डॉ. बाबासाहेब देशमुख हे उच्च विद्या विभूषित आहेत. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदवी प्राप्त केली आहे. भाई गणपतराव देशमुख यांचे ते नातू तथा भाई पोपटराव देशमुख यांचे सुपूत्र आहेत. भाई गणपतराव देशमुख यांचे राहणीमान खूपच साधे असायचे. पांढरा शुभ्र साधा पोशाख व पायात चप्पल असे स्वरूप असे. गावखेड्यातून आलेल्या खेडूतासोबत ते मनमोकळेणाने संवाद साधत असत. लोकांची साध्यातली साधी अडचण ते लक्ष घालून सोडवत असत. अगदी तंतोतंत राहणीमान डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख हे आबासाहेबांप्रमाणे साधा पोशाख परिधान करतात. भाषाशैलीही आबासाहेबांप्रमाणे मृदू आणि अपील करणारी आहे. आबासाहेब हे लोकांत मिसळून, जमिनीवर बसून संवाद साधत असत. अगदी त्यांच्यासारखी शैली डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी अवलंबली आहे.

कै.आबासाहेबांचे जणू प्रतिरूपच
भाई गणपतराव देशमुख तथा आबासाहेब हे संयमी आणि रुजू व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या तोंडून अपशब्द कधीही निघत नसत. एखाद्याने टीका केली तरी त्या टीकेबाबत ते विचार करून उत्तर देत असत.त्यांची विधिमंडळातील भाषणे अभ्यासपूर्ण असत. आबासाहेबांप्रमाणे बोलण्याची, चालण्याची व एकूण देहबोलीची शैली डॉ. बाबासाहेब देशमुख यांची आहे.

जनसंपर्काचे जाळे

गेली 2 वर्षाच्या कोरोना काळात डॉ. बाबासाहेबांनी अनेकांना फोन करून, धीर दिला, मदत केली. त्यावेळी बाबासाहेब कलकत्त्यात होते, तरीही आबासाहेब असताना बाबासाहेब तालुकावासियांची काळजी करीत होते. आता आबासाहेबांच्या निधनानंतर राजकारणात ते सक्रिय झाले आहेत. त्यांचे बंधू डॉ. अनिकेत यांच्यामुळे बळ मिळाले आहे. दांडगा जनसंपर्क, जनसेवेची आवड असल्याने सद्या ते तालुकाभर चर्चेत आहेत.

शेकाप तालुक्यात अव्वल
तालुक्यात शेकापचे जाळे विस्तृत आहे. अनेक ग्रामपंचायती, विकास सेवा सोसायट्या, विविध सहकारी संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. चोख कारभाराची त्रिसूत्री यामुळे तालुक्यात ५५ वर्षापासून राज्य गाजवीत आहे. मिनी मंत्रालय असलेली पंचायत समिती, जिल्हा परिषद, शेतकरी सहकारी सूत गिरणी, खरेदी-विक्री संघ, मार्केट कमिटी व अन्य संस्थांनी तालूकाभर विकासाची गंगोत्री वाहिलेली आहे.

आबासाहेब यांचे निधन झाल्याने आता सांगोल्यात शेकापचे काय होणार असा प्रश्न विचारला जात होता. मात्र डॉ. बाबासाहेब व डॉ. अनिकेत देशमुख यांनी लोकसेवेचे व्रत हाती घेतले आहे. जनसंपर्कामुळे सांगोल्यातील स्टेशन रोडवरील बंगला पुन्हा गर्दीने फुलून जात आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका