विद्यापीठे व महाविद्यालये लवकरच सुरू करणार : उच्च शिक्षणमंत्री सामंत

लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश

Spread the love

नांदेड (विशेष प्रतिनिधी ) : राज्यातील सर्व विद्यापीठांसह महाविद्यालये ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील काही दिवसांत ऑफलाईन महाविद्यालये सुरू होतील; परंतु कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच कॅम्पसमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडील उपलब्ध लशींमधून ३० टक्के कुप्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवाव्यात, अशा सूचनाही देण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी नांदेड येथे दिली.

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठास भेट देऊन विविध विभागांचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. या वेळी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा  हंबर्डे आणि नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर उपस्थित होते. मंत्री सामंत म्हणाले, कोरोनामुळे ऑनलाईन सुरू असलेले वर्ग आता ऑफलाईन सुरू होऊ शकतील. यासाठी तयारी सुरू आहे. राज्यात एकूण ४२ लाख विद्यार्थी उच्च व तंत्रशिक्षणासाठी प्रवेशित आहेत. राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांचा आढावा घेतला आहे. कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात व विद्यापीठ कॅम्पसमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

३० टक्के लशी विद्यार्थ्यांसाठी राखीव
जिल्हाधिकाऱ्यांकडे उपलब्ध लशींमधून ३० टक्के  लशी विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नांदेडमधून हा प्रयोग सुरू केला जाणार असून यंत्रणेने आदर्श पद्धतीने हा प्रयोग राबवावा. त्यानंतर या प्रयोगाची अंमलबजावणी होईल.

नांदेड विद्यापीठात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू करणार असल्याची माहिती सामंत यांनी त्यांच्या मागील दौऱ्यात दिली होती. आता यासंदर्भातील काम अंतिम टप्प्यात असून पुढील दोन-तीन दिवसांत माझी स्वाक्षरी झाल्यानंतर या कामाला सुरुवात होईल. त्यासाठी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
प्राध्यापकांबरोबरच काही प्राचार्यांचीही पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर २६० प्राध्यापकांची राज्यभरात भरती करण्यात आली असून एकूण ३०७४ पदांना मंजुरी देण्यात आली आहे; परंतु अर्थमंत्रालयाने यासंदर्भात भरती प्रक्रिया काही काळ थांबविण्याची मागणी केली असल्याने ती तात्पुरती थांबविण्यात आली असली तरी अर्थमंत्रालयाच्या परवानगीनंतर ती पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांनी सांगितले.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका