ताजे अपडेट
Trending

बाबासाहेबांच्या विजयाची पाच कारणे

Spread the love

डॉ. बाबासाहेब देशमुख जेव्हापासून तालुक्यात उघडपणे सक्रिय झाले तेव्हापासून “बाबासाहेब प्रति आबासाहेब” हे स्लोगन तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मनात पद्धतशीरपणे रुजले किंवा रुजवण्यात आले. त्याचे कारणही तसेच होते. बाबासाहेबांचे राहणीमान आणि देहबोली यामध्ये कार्यकर्ते आबासाहेबांना पाहत होते. आबासाहेब तथा गणपतराव देशमुख हे साधी राहणी, उच्च विचारसरणी हे तत्त्व मानणारे होते. हेच तत्व बाबासाहेब देशमुख यांनी अंगीकारले आणि तिथूनच त्यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या मनात आपले स्थान बळकट केले.

सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे
शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दोन दिग्गज नेत्यांना पराभूत करत सांगोला विधानसभा मतदारसंघावर शेकापचा लालबावटा पुन्हा एकदा रोवला आहे. त्यांचा हा विजय साधासुधा नाही. त्यांच्या विजयाची अनेक कारणे आहेत. त्यापैकी पाच महत्त्वाच्या कारणांवर टाकलेला प्रकाशझोत..

  • सहानुभूतीची लाट
    भाई गणपतराव देशमुख हे हयात असतानाच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांचा केवळ 768 मतांनी पराभव झाला होता. त्या वेळचे एकसंघ शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांनी हा पराभव केला होता. शहाजीबापूंना दीपक आबांची साथ होती त्यामुळे दोघांनी एकजीवपणे निवडणूक लढवल्याने शेकापसा वारू रोखणे या दोघांना शक्य झाले होते. 2019 च्या निवडणुकीनंतर अवघ्या दीड वर्षात भाई गणपतराव देशमुख यांचे दुःखद निधन झाले. भाई गणपतराव देशमुख यांच्या हयातीतच त्यांना स्वतःच्या पक्षाचा पराभव पहावा लागला होता. या पराभवाची सहल शेकाप कार्यकर्त्यांच्या मनात मागील पाच वर्षांपासून सलत होती. या पंचवार्षिक निवडणुकीत डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी “मागील 55 वर्षे आबासाहेबांनी गोरगरीब जनतेची सेवा केली. त्यांना खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर शेकापला पुन्हा एकदा संधी द्या”असे भावनिक आवाहन केले होते. एकीकडे भाई गणपतराव देशमुख यांच्या हयातीतच झालेला पक्षाचा पराभव आणि दुसरीकडे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी “विजयी होऊन आबासाहेबांना श्रद्धांजली वाहूया” ही मतदारांना घातलेली साद या दोन्ही गोष्टींमुळे या निवडणुकीत सहानुभूतीची लाटच जणू ऊसळल्याचे दिसत होते. शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बाबासाहेब देशमुख यांचे हे भावनिक आवाहन मनावर घेऊन “भाई गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली व्हायची असेल तर शेकापला पुन्हा एकदा विजयी करावे लागेल” ही बाब मनावर घेतली आणि तिथूनच बाबासाहेब देशमुख यांच्या विजयाचा मार्ग बऱ्यापैकी सुकर झाला होता. बाबासाहेबांच्या विजयाचे हे एक अत्यंत महत्त्वाचे कारण मान्यच करावे लागेल.
  • अविरत जनसंपर्क
    कोरोना काळात बाबासाहेब देशमुख यांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढवला होता. तालुक्यातील सर्वच घटकातील लोकांना त्यांनी फोन करून कोरोना काळात धीर दिला होता. त्यांचा प्रत्यक्षात तालुक्यातील जनतेशी थेट संबंध यापूर्वी आला नव्हता. मात्र आ. गणपतराव देशमुख यांचा नातू स्वतः आपल्याला कॉल करतो आणि आपल्या तब्येतीची विचारपूस करतो ही बाब अनेकांना सुखद धक्का देणारी होती. ती गोष्टही बाबासाहेबांच्या प्रति सहानुभूती व्यक्त करणारी ठरली. मधल्या काळात बाबासाहेब देशमुख तालुक्यातील राजकारणात आणि समाजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले होते. अनेकांच्या सुख-दुःखात त्यांनी हजेरी लावली होती. त्यांनी अनेक प्रश्नांना घेऊन आंदोलने केली होती. तळागाळातील छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांशी तसेच ज्येष्ठ वयोवृद्ध कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क होता. व्यापक जनसंपर्क हे कारण हे बाबासाहेबांना विजयाकडे घेऊन जाणारे ठरले.
  • बाबासाहेब प्रति आबासाहेब
    डॉ. बाबासाहेब देशमुख जेव्हापासून तालुक्यात उघडपणे सक्रिय झाले तेव्हापासून “बाबासाहेब प्रति आबासाहेब” हे स्लोगन तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मनात पद्धतशीरपणे रुजले किंवा रुजवण्यात आले. त्याचे कारणही तसेच होते. बाबासाहेबांचे राहणीमान आणि देहबोली यामध्ये कार्यकर्ते आबासाहेबांना पाहत होते. आबासाहेब तथा गणपतराव देशमुख हे साधी राहणी, उच्च विचारसरणी हे तत्त्व मानणारे होते. हेच तत्व बाबासाहेब देशमुख यांनी अंगीकारले आणि तिथूनच त्यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या मनात आपले स्थान बळकट केले. बाबासाहेब देशमुख हे सेम टू सेम आबासाहेबांप्रमाणे वागतात. तेच आपले आबासाहेब आहेत ही भावना कार्यकर्त्यांच्या मनात रुजली. पांढरा फुल शर्ट, काळी पॅन्ट, शर्टाच्या खिशाला आबासाहेब जसा वापरत होते तसाच सेम टू सेम पेन, बोलण्याची, चालण्याची लोकांशी संवाद साधण्याची पद्धतही तशीच. या सर्व गोष्टी कार्यकर्त्यांना भावत होत्या. ही बाबही बाबासाहेबांना विजयाकडे घेऊन जाणारी ठरली.
  • निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन
    विधानसभेची निवडणूक जाहीर होऊन अनेक दिवस उलटले तरीही उमेदवारी नेमकी कुणाला? बाबासाहेब की अनिकेत? या प्रश्नाचे उत्तर मिळेपर्यंत अनेक दिवस निघून गेले. मात्र भाई जयंत पाटील यांनी सांगोल्यात येऊन बाबासाहेबांच्या उमेदवारीची घोषणा केली तेव्हापासूनच बाबासाहेब आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीचे अत्यंत कमी वेळेत सूक्ष्म नियोजन केले. विविध गावांमधील प्रचार सभांचे नियोजन, जाहीर सभांचे नियोजन, सभांचे वेळापत्रक, सभांमधील भाषणातील मुद्दे, कॉर्नर बैठका, प्रसिद्धी पत्रके, निवडणुकीचा अजेंडा आदी सर्व बाबींवर स्वतः बाबासाहेब देशमुख लक्ष ठेवून होते. प्रचार सभांमध्ये खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, त्यांच्या पत्नी शितलदेवी मोहिते-पाटील, होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह होळकर यांचा अपवाद वगळता कोणीही नामवंत वक्ता किंवा नेता सहभागी नव्हता. असे असतानाही दोघा देशमुख बंधूंनी आक्रमकपणे भाषण करत सभा गाजवल्या. डॉ. सुदर्शन घेरडे, प्रदीप मिसाळ, बापूसाहेब ठोकळे, ऍड. शंकर सरगर आधी नेत्यांनीही बाबासाहेबांच्या सभा गाजवल्या. निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन ही बाब त्यांच्या विजयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
  • तरुणाईला साद
    बाबासाहेबांनी तब्बल 55 वर्षे या तालुक्याचे नेतृत्व केले. मात्र या तालुक्यात कधीही महिलांची छेडछाड, गुंडगिरी, अवैध धंदे, भ्रष्टाचार, प्रशासनाची बेपर्वाई या गोष्टी घडल्या नाहीत. त्यांच्या काळात कधीही जातीवादाला थारा मिळाला नाही. पाच वर्षात या सर्व गोष्टींनी डोके वर काढले आहे. आपला तालुका पुन्हा एकदा शांततावादी आणि सर्व संपन्न बनवायचा असेल तर पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाला विजयी करावे ही बाब बाबासाहेब देशमुख यांनी लोकांमध्ये रुजवली. सत्ताधारी आमदारांच्या विरोधातील ही परिस्थिती सर्वसामान्यांनी मनावर घेतली आणि बाबासाहेबांवर विश्वास दाखवत त्यांच्या पारड्यात मतदानरुपी भरघोस दान टाकले ही वस्तुस्थिती आहे.

बाबासाहेबांच्या विजयातील ही पाच महत्त्वाची कारणे असली तरी अशी अनेक कारणे त्यांच्या विजयातील महत्त्वाचा घटक बनली आहेत.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका