आण्णा, दीर्घायुषी व्हा!
ACP भरत शेळके : एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व
‘एसीपी भरत शेळके’ हे नाव उच्चारताच अंगावर रोमांच उभं राहतात. ते केवळ खाकी वर्दी आहे म्हणून नव्हे; तर त्या खाकी वर्दीच्या आत दडलेला हळव्या मनाचा माणूस, समाजवास्तवाचा अभ्यासक आणि कृतीशील कार्यकर्ता म्हणून ते अधिक भावतात.
खरं तर पत्रकारांनी पोलिसांच्या जास्त जवळ जायचं नसतं असं म्हटलं जातं. त्याला कारणंही अनेक असतील. भरत शेळके मात्र याला अपवाद आहे. मुंबईतील संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी भरत शेळके यांनी एकीकडे निधड्या छातीने अनेक गँगस्टरचे एन्काऊंटर केले, तर दुसरीकडे त्यांनी पत्रकारांसह सामाजिक कार्यकर्त्यांचा, संवेदनशील व कृतीशील माणसांचा मोठा मित्र-परिवार गुंफला.

माझा आणि त्यांचा परिचय सुमारे सोळाएक वर्षांपूर्वीचा. म्हणजे मी पत्रकारितेत येण्यापूर्वीचा. शेळके हे मूळचे सांगोला तालुक्यातील सावे या गावचे. सांगोल्यात विविध सामाजिक उपक्रमांच्या निमित्ताने त्यांचा परिचय झाला आणि पुढं हे नातं कधी मित्र, कधी मोठा भाऊ, तर कधी वडिलधारी माणूस या नात्यातून फुलत गेलं.
खरं तर खेडेगावातून संघर्ष करीत आपल्या वाटा निर्माण करणा-या माझ्यासारख्या शेकडो तरुणांना भरत शेळके यांनी सर्वतोपरी बळ दिलंय. पोलिस खात्यात क्वचितच अशी माणसं आढळतील. मला आठवतंय. २००२ साली भरत शेळके हे सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक असताना तेथे त्यांना भेटण्याचा योग आला होता. एका सामाजिक उपक्रमाची आखणी करण्यासाठी मी व माझे मित्र अॅड. सुनील जगधने मुंबईत पोहोचलो. शेळके यांची भेट झाली. चर्चा झाली. आम्ही पोलिस ठाण्यातून बाहेर निघताच मुसळधार पाऊस सुरु झाला. मुक्कामाची सोय नव्हती. त्यात मी मुंबईत नवखा. मात्र, भरत शेळके यांनी स्वत: त्या भल्या मध्यरात्री पोलिस क्वार्टरमध्ये आमची मुक्कामाची सोय केली. पुढे सातत्याने त्यांच्या भेटी होत गेल्या आणि ऋणानुबंध वृध्दिंगत होत गेले.
• दोन हजार कोटींच्या अंमली पदार्थाचा पर्दाफाश
भरत शेळके हे ठाणे येथे गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्तपदी कार्यरत असताना दोन वर्षांपूर्वी त्यांनी सोलापूर येथील कोंडी एमआयडीसीमध्ये चालणार्या इफेड्रीन कंपनीवर छापा टाकून धाडसी कारवाई केली होती. 2 हजार कोटींहून अधिक व्याप्ती असलेल्या या गुन्ह्याचा छडा लावण्यात त्यांना यश आले. या प्रकरणात सिनेअभिनेत्री ममता कुलकर्णी, विकी गोस्वामी आदी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करांवर गुन्हे दाखल केले गेले. त्यांच्या या कारवाईचा आधार घेत विदेशी पोलिस यंत्रणेने आंतरराष्ट्रीय रॅकेट उदध्वस्त करण्यास सुरुवात केली.
• मजूर ते एसीपी
भरत शेळके यांचा जन्म सावे (ता. सांगोला) येथे झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेळके यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. प्रसंगी मोलमजूरी करीत शिक्षणाच्या वाटेवर मार्गक्रमण केले. पदवी शिक्षणानंतर त्यांनी पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) परीक्षा देऊन ते उत्तीर्ण झाले. तेथूनच त्यांच्या करिअरला कलाटणी मिळाली. अल्पावधीतच त्यांनी मुंबई व परिसरातील गुन्हेगारीजगतावर जरब बसविली. विशेषतः नवी मुंबईतील गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी अनेक धाडसत्रे राबविली. अरुण गवळी, छोटा राजनचा हस्तक डी.के. राव, गँगस्टर रवी पुजारीला अटक केली. दिग्दर्शक सुभाष घईंच्या हल्लेखोराच्या मुसक्या आवळल्या. मटकाकिंग सुरेश भगत, फरीद तनाशा, नामदेव पाटील, योगेश पराडकर यांच्यासह दाऊदच्या टोळीतील गुन्हेगारांवर जरब बसविली. अनेक सराईत गुन्हेगारांच्या एन्काऊंटरमध्ये त्यांचा थेट सहभाग होता. भरत शेळके यांना राष्ट्रपती पदकासह विविध 263 सन्मानपदके मिळाली आहेत. त्यांना उत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून गौरविण्यात आले आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, पंतप्रधान मनमोहनसिंग, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, विलासराव देशमुख यांचे विशेष सुरक्षा अधिकारी म्हणून शेळके यांनी काम केले आहे. त्यांनी पोलिस सेवेच्या माध्यमातून सांगोला तालुक्याचे नाव देशपातळीवर नेले आहे.
• बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रभाव
सांगोला येथे भरत शेळके यांनी बौध्द धम्म परिषदेच्या माध्यमातून शांततावादी बौध्द धम्माच्या प्रसारासाठी प्रयत्न केले. श्रामणेर शिबिराच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात संस्कारशील, विवेकवादी युवा वर्ग तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक सलोखा वाढावा यासाठी ते सक्रीयपणे प्रयत्नशील असतात. त्यांनी सांगोला तालुक्यातील सर्व गावांतील समाज मंदीर तसेच बुध्दविहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुध्द यांच्या प्रतिमा, ‘बुध्द अॅण्ड हिज धम्म’ हा ग्रंथ भेट दिला आहे. भेट दिलेल्या प्रत्येक गावांत समतावादी चळवळीला बळकटी मिळावी, यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.
राष्ट्रपतीपदक मिळविणारे शेळके हे सांगोला तालुक्यातील पहिले सुपूत्र आहेत.
भरत शेळके अर्थात आण्णा यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त हा लेखन प्रपंच. आण्णांचे कर्तृत्व हा भल्या मोठ्या ग्रंथाचा विषय आहे. त्यांच्या संघर्षातूनच प्रेरणा घेऊन माझ्यासारखे युवक धडपड करीत आयुष्य घडविताना दिसताहेत.
पुनश्च एकदा आण्णांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
– डॉ. बाळासाहेब मागाडे, सोलापूर



