डिजिटल साक्षरतेचा वैचारिक जागर : “डिजिटल इलेक्शन”

डॉ. शिवाजी जाधव यांच्या नव्या कोऱ्या ग्रंथाचा परिचय करुन देताहेत सचिन वायकुळे

Spread the love

राज्यासह देशभरात दररोज विविध विषयांवरील, विविध भाषांतील असंख्य ग्रंथ प्रसिद्ध होत असतात. या ग्रंथांची माहिती सर्वदूर वाचकांना व्हावी,  ग्रंथाचा हा ज्ञानरुपी ठेवा मनोमनी पोहोचावा, या प्रांजळ हेतूने ‘थिंक टँक लाईव्ह’तर्फे आम्ही ग्रंथ परिचयाचा हा विशेष उपक्रम सुरु करीत आहोत. या सदरात महत्त्वपूर्ण,  निवडक व दखलपात्र ग्रंथाचा परिचय करुन देत आहोत. आजच्या सदरात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे प्राध्यापक डॉ. शिवाजी जाधव लिखित व थिंक टँक पब्लिकेशन्स प्रकाशित “डिजिटल इलेक्शन” या महत्त्वपूर्ण ग्रंथाची ओळख करुन देताहेत नामवंत पत्रकार तथा लेखक सचिन वायकुळे. – संपादक मंडळ

पाण्याचा अर्धा ग्लास समोर ठेवल्यानंतर दोन मतप्रवाह समोर येतील. अर्धा ग्लास पाण्याने भरला आहे, आणि दुसरे म्हणजे अर्धा ग्लास रिकामा आहे. याचा अर्थ इतकाच की, कोणत्याही वस्तूकडे, प्रसंगाकडे, हालचालीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा एक दृष्टीकोन असतो. समाजमाध्यमे अर्थात सोशल मीडियाबाबतही नेमके असेच झाले. याकडे कोणी कसे पाहिले त्यानुसार पाहणा-या प्रत्येकाने या मीडियासंबंधी आपले मत तयार केले. राजकीय पक्ष व नेते हा घटक मात्र या माध्यमांकडे एकाच नजरेतून पाहत आला. अनेकांगाने या मीडियाचा वापर राजकीय मंडळी करीत राहिले. सोशल मीडियाच्या विविध अंगांना स्पर्श करीत लेखक डॉ. शिवाजी जाधव यांचे “डिजिटल इलेक्शन” हे पुस्तक यासंबंधीची खूप काही माहिती वाचकांना देते.

सोशल मीडियाची उपयुक्तता लक्षात घेत व याचा अचूक वापर करत राजकीय पक्षांनी, नेत्यांनी अक्षरश: निवडणुकांतील वातावरण फिरवले. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत प्रचारासाठी सोशल मीडियाचा (समाज माध्यमाचा ) राजकीय पक्षांनी केलेला वापर अचंबित करणारा आहे. हे नेमके कसे झाले? कोणत्या क्लृप्त्यांचा वापर करण्यात आला? यासह आजपर्यंत अनुत्तरीत राहिलेल्या कितीतरी प्रश्नांची उत्तरे “डिजिटल इलेक्शन” या पुस्तकात सापडतात. सोशल मीडिया नेमका काय आहे, आणि राजकारणात याचा प्रभाव अस्त्र म्हणून कसा वापर झाला? यावर आकडेवारीसह या पुस्तकांत प्रकाश टाकण्यात आला आहे.

प्रचारासाठी समाज माध्यमाचा किती अचूक वापर करता येऊ शकतो हे सांगते. तासनतास सोशल मीडियावर वावरणा-या तरुण पिढीचे मत परितर्वन करत त्यांच्यावर छाप पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी याच माध्यमांचा वापर कसा केला. याचे विस्ताराने विवेचन पुस्तकातील प्रत्येक प्रकरणांत आहे.

अध्यक्षपदाच्या दोन्ही निवडणुकीवेळी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी समाज माध्यमांत सक्रीय असलेल्या तरुणांवर लक्ष केंद्रित केले आणि प्रचारयंत्रणा राबविली. परिणामी २५ वर्षांच्या आतील ७० टक्के मते ओबामांना मिळाली. वेब माध्यमांचा वापर करत त्यांनी व्हाईट हाऊस ताब्यात घेतले. सप्टेबर २००८ च्या आकडेवारीनुसार फेसबुकवर ओबामा यांचे पाठीराखे प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा अधिक असल्याचे समोर आले. मायस्पेसवर ओबामा यांचे ५ लाख १० हजार ७९९ फ्रेंडस् तर तत्कालीन त्यांचे प्रतिस्पर्धी मॅकेन यांचे ८७ हजार ६५२ फ्रेंडस् होते. याचा पुरेपूर फायदा घेत ओबामा पुढे सरकले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात वापरण्यात आला. तेथील ४ कोटी ९० लाख मतदारांपैकी साते तीन कोटी स्मार्ट फोन युजर्स होते.

याचा अर्थ पारंपरिक प्रचारपध्दतीच्या कितीतरी पुढे जात ऐन निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी, तेलंगणाचे के. चंद्रशेखर, आंध्रप्रदेशचे एन.टी.रामाराव यांच्या जीवनावर आलेले चित्रपट निवडणुक आयोगाने ‘सोरोगेट पब्लिसिटी’ ठरवत निवडणुक काळापुरते कसे रोखले याबाबत लेखक डॉ. जाधव यांनी उत्तम संदर्भ व माहिती दिली आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) नेमके काय? आणि याचा वापर कशाप्रकारे करण्यात आला? या दुर्लक्षित मुद्द्यांकडे लेखकाने वाचकांचे लक्ष वेधले आहे. दोनशेपैकी २० वृत्तपत्रांनी पाठराखण केल्यानंतरही केवळ सोशल मीडियाच्या अाधारावर डोनाल्ड ट्रंप कसे विजयी झाले?, जनलोकपाल ते दिल्लीचे मुख्यमंत्री या सबंध प्रवासात ‘कॉमन मॅन’ ही आपली प्रतिमा जनतेच्या मनात पक्की करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी हा मीडियाचा वापर किती अचूक केला हे या पुस्तकांत लेखकाने अभ्यासपूर्ण मांडले आहे.

२०१४ मध्ये मोदी युगाचा आरंभ आणि मग पुढील अनेक ठिकाणी सत्तांतर करण्यात यशस्वी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करीत, मात्र या वापराची नेमकी आणि अचुक सूत्रे कोणती होती? याचा उहापोह विस्ताराने या पुस्तकात वाचकाला अनुभवयास मिळतो. मोदींच्या अर्थात भाजपाच्या या सोशल मीडियावरील सततच्या प्रहारांना तितक्याच ताकदीने अन् त्याचमाध्यमाद्वारे काँग्रेस कसे उत्तरे देत राहिली व प्रचार करीत राहिली यासह अनेक गोष्टी स्वतंत्र्य प्रकरणात मांडल्या आहेत. शेवटच्या प्रकरणात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नेकमे काय चित्र होते तसेच पक्षीय बलाबल राज्यातील राजकीय पक्षांची माहिती अतिशय अभ्यासपूर्ण अशी आहे.

लेखकाने या पुस्तकासाठी खूप परिश्रम घेतले असल्याने कोणतेही प्रकरण वाचायला घेतल्यास त्यातून सतत नवी माहिती वाचकाच्या हाती लागते. खरंच डिजिटल साक्षरतेचा उत्तम नमुना म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल. अशा विषयांवर खूप कमी पुस्तके असल्याने ‘डिजिटल इलेक्शन’ या पुस्तकाचे महत्त्व देश पातळीवर, राज्य पातळीवर तसेच जिल्हा, तालुका व गावपातळीवर निश्चितच वाढले आहे. व्हॉट्सअ‍ॅप डेमॉक्रसी, ट्टिटर ड्रेंड, पेड न्यूज, वेब सिरीजमधून प्रचार, सोशल मीडिया आचारसंहिता ही प्रकरणे वाचत असताना सोशल मीडिया इतके दिवस हाती असतानाही यासंबंधीचे किती अज्ञान घेऊन जगत होतो, हे वाचकांना पुस्तक वाचून हातावेगळे केल्यानंतर जाणवते. ‘डिजिटल इलेक्शन’ या पुस्तकापूर्वी बारा दर्जेदार पुस्तकांचे लेखन करणारे डॉ. जाधव यांनी अतिशय साध्या, सोप्या आणि सर्वच घटकांना समजेल शा भाषेत या पुस्तकाची मांडणी केली आहे. मुखपृष्ठ, मलपृष्ठ तसेच पुस्तकाची बांधणी या पातळीवर सोलापूरचे थिंक टँक पब्लिकेशन अ‍ॅण्ड डिस्ट्रीब्युशन्स यांची कल्पकता जाणवते.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागात प्राध्यापक असणारे डॉ. शिवाजी जाधव यांचे हे पुस्तक राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी तर वाचावेच, शिवाय सोशल मीडियासंबंधी अज्ञान असणा-या व याची उपयुक्तता माहित नसणा-या प्रत्येकाने ते वाचायला हवे.

 – सचिन वायकुळे, बार्शी

  • पुस्तक : डिजिटल इलेक्शन
  • लेखक : डॉ. शिवाजी जाधव
  • प्रकाशक : थिंक टँक पब्लिकेशन अ‍ॅण्ड डिस्ट्रीब्युशन्स, सोलापूर
  • (पुस्तक खरेदीसाठी संपर्क : 98811 91229)

या ग्रंथ परिचयाचे लेखक श्री. सचिन वायकुळे हे नामवंत वक्ते, अभ्यासक आणि पत्रकार आहेत. ते बार्शी (जि. सोलापूर) येथील स्मार्ट अ‍ॅकॅडमी भाषण प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक व प्रशिक्षक आहेत. या अॅकॅडमीत प्रभावी वक्ते घडविले जातात. वायकुळे यांचे विविध विषयांवरील लेख विविध मुद्रित माध्यमांत प्रसिद्ध झाले आहेत. ते सोशल मीडियावरही सातत्याने विविध विषयांवर लेखन करीत असतात.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका