गुन्हे वार्तांकन सजगपणे व्हावे : अभय दिवाणजी

पु.ह.ओ. सोलापूर विद्यापीठाच्या माध्यम सप्ताहात प्रतिपादन

Spread the love

सोलापूर : प्रतिनिधी

गुन्हेविषयक बातम्या या वाचकांकडून सर्वाधिक वाचल्या जातात. तरीही हे बीट दुर्लक्षित आहे. समाजातील गुन्हेविषयक मानसिकता मांडतानाच त्यातूनही पुढे येणारी सकारात्मकता मांडून सजगपणे पत्रकारिता करायला हवी, असे प्रतिपादन दै. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठातील  सामाजिकशास्त्रे संकुलांतर्गत मास कम्युनिकेशन विभागातर्फे पत्रकार दिनानिमित्त ‘जागर पत्रकारितेचा’ या माध्यम सप्ताहात ते बोलत होते. ‘गुन्हे वार्तांकन’ या विषयावर त्यांनी मांडणी केलो. यावेळी मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ.रविंद्र चिंचोलकर उपस्थित होते.

दिवाणजी पुढे म्हणाले की, गुन्हे वार्तांकन करताना घटनेची परिपूर्ण माहिती घ्यायला हवी. त्याचे लेखन जबाबदारीने करायला हवे. गुन्हे पत्रकारितेला वेळेची मर्यादा नसते. सदैव अलर्ट राहून बातम्या मिळवाव्या लागतात. गुन्हे वार्तांकन करताना आपले स्त्रोत भक्कम करावे लागतात. कार्यालयातील वाहनचालक, शिपाई हे सुद्धा आपल्या बातम्यांचे चांगले स्त्रोत बनू शकतात. गुन्हे वार्तांकन करताना कायद्याचेही किमान ज्ञान असायला हवे.

यावेळी दिवाणजी यांनी त्यांच्या ३० वर्षातील पत्रकारितेतील अनेक महत्वाचे किस्से विद्यार्थ्यांना सांगितले. रंगाअण्णा वैद्य यांच्या सहवासातील काही आठवणी सांगितल्या. गुन्हे वार्तांकन करताना आधुनिक तंत्रज्ञानसुद्धा अवगत करायला हवे. माहितीचे स्त्रोत विकसित करण्यासाठी विविध शासकीय विभागांची परिपूर्ण माहिती अवगत करायला हवी असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी कांबळे यांनी केले. यावेळी मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ.रविंद्र चिंचोलकर यांच्यासह डॉ.अंबादास भासके, डॉ. बाळासाहेब मागाडे, ऋषिकेश मंडलिक या अध्यापाकांसह विद्यार्थी उपस्थित होते

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका