ही दुर्दैवी वेळ कोणावरही येऊ नये!
डिकसळमधील दिव्यांग, असहाय कुटुंबियाला हवाय मदतीचा हात
- ही दुर्दैवी वेळ कोणावरही येऊ नये!
- डिकसळमधील सुखदेव जवळेकरांच्या मृत्यूने दिव्यांग कुटुंबिय उघड्यावर
- दिव्यांग, असहाय कुटुंबियाला हवाय मदतीचा हात
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
घरात अठराविश्वे दारिद्र्य, ४५ हून अधिक वयाची दोन्ही अविवाहित दिव्यांग लेकरे. अशातच या दोन्ही लेकरांचे पालनकर्ते पिता ८५ वर्षीय सुखदेव साळुंखे (जवळेकर) हे संपूर्ण कुटुंबीयांची जबाबदारी रडतखडत सांभाळत होते. मात्र, मागील महिनाभरापासून सुखदेव हे अंथरुणावर पडूनच होते. त्यांनी कोरोना लसही घेतली होती. अशातच आजारपणात त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले आहे. या असहाय, दिव्यांग कुटुंबाला आर्थिक आधार देण्याची खूप गरज आहे.

घरात दोन्ही लेकरे अपंग
डिकसळमधील सुखदेव जवळेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांची वाताहत न पाहवणारी अशीच आहे. घरात दोन्ही लेकरे अपंग. तीही ४५ व ५० वर्षाची. सुखदेव यांचे वय ८५ होते. तर मुलगा सुभाष ५० वर्षाचा आणि कमलाबाई ही मुलगी ४५ वर्षाची. यातील सुभाष हा भोळसर, कमलाबाई हाताने व पायानेही दिव्यांग. यातील सुखदेव व कमलाबाईला शासनाची पेन्शन मंजूर असली तरी तीही वेळेवर मिळत नाही. घरात सर्व वयोवृध्द, दिव्यांग असल्याने त्यांचे जिणे हे अंधकारमय असेच आहे.
सणासुदीचा पत्ता नाही
कोणताही सण ना उत्सव अशीच या साळुंखे कुटुंबीयांची परवड आहे. वयाची ८५ ओलांडल्याने सुखदेव हे अंथरुणावरच पडून होते. तसे ते आजारी ही होते. परवा काही दिवसापूर्वी गावातील आरोग्य सेविकांनी त्यांना लस टोचली अन् सुखदेव यांचा अकस्मात मृत्यू झाला.
आम्हाला रेशनचा माल कसा मिळेल?
सुखदेव यांचे निधन झाल्याचे अतीव दुःख दोन्ही लेकरांना झाले असून, सुभाष हा तर आता वेड्यासारखा करीत आहे. कमलाबाई आपल्या बहिणीकडे शिरसी (ता. मंगळवेढा) येथे राहावयास गेली आहे. ‘बाप मेला आम्ही कसं जगायचं’ असा आक्रोश करत कमलाबाई आलेला दिवस ढकलत आहे. आम्हाला रेशनचा माल कसा मिळेल? अशी सारखी विचारणा ती करत आहे.
आपुलकी प्रतिष्ठानने दिवाळीला केली होती मदत
याच साळुंखे कुटुंबीयांची दीपावली आपुलकी प्रतिष्ठानने दिवाळ फराळ व कपडे देवून साजरी केली. आज डिकसळमधील साळुंखे कुटुंबीय सुखदेव जवळेकर यांच्या जाण्याने पोरके झाले आहे. “लस घेतल्याने माझा बाप मेला आत्ता आम्ही कसं जगायचं” असे कमलाबाई सारखे म्हणते.
जवळेकर कुटुंबीयांची वाताहत
सुखदेव जवळेकर कुटुंबीय हे मूळचे जवळ्याचे. त्यांचे साळुंखे-पाटील घराणे. पण सुखदेव हे डिकसळला स्थायिक झाल्यानंतर डिकसळवासियच झाले. जमीन जुमला होता पण तो विकला. आता राहते घरही दुसऱ्याच्या जागेत. आता त्यांच्या पश्चात घरी दोघेही अपंग लेकरे. यातील कमलाबाईनाही शासनाची पेन्शन वेळेवर मिळत नाही. सुखदेव गेल्याने हे घर अटा उघड्यावर पडले आहे.
रेशनच्या मालावरच मदार
ना जमीन जुमला वा हक्काचे घर. दुसऱ्याच्या रानात छप्पर वजा झोपडी उभारून सुखदेव जवळेकर व त्यांचे कुटुंबीय राहत होते. त्यांची रोजी-रोटी ही रेशनच्या मालावरच, आत्ता सुभाष वेडसर असल्यासारखा वागत झाल्याने त्यांना रेशनचा मालही मिळेना झाला आहे.

गावपुढारी यांचा वापर केवळ मतासाठीच करतात. आमच्याकडे कुणीबी ढुंकूनही बघत नाही, असे कमलाबाई सांगत होत्या.



