आंबेडकरी ग्रंथांचे संग्राहक रमेश शिंदे
मिलिंद मानकर यांचा विशेष लेख
जगात अनेक प्रज्ञावान ग्रंथप्रेमी होऊन गेले. ग्रंथासाठी सर्वस्वाचा त्याग करणारा सिसरो होता. ‘ग्रंथ वाचण्याची मनाई करून कोणी मला राजा बनविले तर मी त्याचा त्याग करीन’ असे मॅकाले म्हणाला होता. वॉल्टर स्कॉट तर मृत्यूशय्येवर अखेरच्या क्षणी कपाटातील ग्रंथांचा वियोग होणार म्हणून धाय मोकलून रडला होता. साने गुरुजी सांगायचे, ‘माझ्या ग्रंथांना हात लावील तो माझ्या हृदयाला स्पर्श करीन.’ पददलितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, ‘ग्रंथांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही. ते मला शिकवितात. नवी वाट दाखवितात.’ एवढेच नव्हे तर आपल्या प्राण प्रिय ग्रंथांकरिता त्यांनी भव्य ‘राजगृह’ उभारले. कालांतराने काही निष्ठावान अनुयायांनी अनुकरण करीत ग्रंथ गोळा करण्याचा छंद जोपासला त्यात रमेश तुकाराम शिंदे यांचे नाव अत्यंत महत्त्वाचे आहे.
रमेश शिंदे यांचा जन्म १५ जुलै १९३३ रोजी चापडगाव, जि. नाशिक येथे झाला. जेमतेम शिक्षण घेतलेल्या रमेशरावांनी बीपीटी डॉक्स मुंबई येथे ३५ वर्षे नोकरी केली. विद्यार्थीदशेत ते मित्रमंडळीसह नरेपार्कवर बाबासाहेबांची भाषणे ऐकण्याकरिता जात. जमिनीवर बसून ते बाबासाहेबांची भाषणे लक्षपूर्वक ऐकत. त्यांची बौद्धिक उंची फार नव्हती. मात्र आपल्या नेत्याचे भाषण ऐकण्याची जबरदस्त उत्सुकता होती. नरेपार्कवर बुद्धजयंतीनिमित्त केलेल्या एका भाषणात बाबासाहेब म्हणाले होते, ‘मी एक जहाजाचा कप्तान आहे. नावेत मला तुम्हाला पैलतीरी न्यावयाचे आहे. हे काम हातून पार पडेल का? मी जगेन कां?’ बाबांच्या या हृदयस्पर्शी बोलाने माझ्या अंतःकरणाला खोल जखम केली होती, असे शिंदे सांगतात. बाबासाहेबांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. तेव्हा ते अवघे २३ वर्षाचे होते.
रमेशराव आणि त्यांच्या मित्रांनी ठरवले की, बाबासाहेबांचे साहित्य गोळा करायचे आणि ते जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याकरिता वाचनालय चालवायचे. दुदैवाने ते राहून गेले. रमेशरावांना तेव्हापासूनच बाबासाहेबांचे साहित्य गोळा करण्याचा छंद जडला. बाबासाहेबांनी लिहिलेल्या ग्रंथाची पहिली आवृत्ती मिळविण्याचा त्यांचा अट्टाहास असायचा. मुंबईत फोर्ट विभागात एका ब्रिटिश कंपनीकडून त्यांना बरेच साहित्य मिळाले त्यात दुर्मिळ साहित्याची संख्या फारच नगण्य होती. दुर्मिळ ग्रंथाचे माहेरघर म्हणजे पुणे शहर. पुणे शहराला पालथे घालून त्यांनी बऱ्यापैकी साहित्य गोळा केले. सत्यशोधक समाजाचे जवळजवळ ७०-८० ग्रंथ त्यांना मिळाले. प्रबोधनकार ठाकरे यांचे २८ ग्रंथ मिळाले. याच ठिकाणी त्यांचा पु. ग. सहस्त्रबुद्धे यांच्याशी परिचय झाला. सहस्त्रबुद्धे यांनी स्वतः लिहिलेल्या ग्रंथाची पहिली आवृत्ती स्नेहपूर्वक त्यांना दिली. कधी कधी रमेशरावांकडे ग्रंथ खरेदी करण्यासाठी पैसे नसायचे. परिवारात वादही व्हायचे. परंतु ते डगमगले नाही. मोठ्या धैर्याने, चिकाटीने, प्रपंच सांभाळून त्यांनी आपला छंद जोपासला.
रमेशराव एका मुलाखतीत म्हणतात, ‘माझ्या कार्यालयात एक कारकून होता. तो खाजगी सावकार होता. त्याच्याकडून व्याजाने पैसे घेऊन मी पुस्तके खरेदी करीत असे.’ ते पुढे म्हणतात, ‘२६ जुलै २००५ रोजी मुंबईत अतिवृष्टी झाली तेव्हा माझ्या घरात पाणी शिरले. काही दुर्मिळ ग्रंथ पाण्याने भिजले. ते विदारक दृश्य पाहून मला अतीव दुःख झाले होते. मी त्या ग्रंथांना हृदयाशी धरून मनसोक्त रडलो होतो. अनेक दिवस मला सुखाने झोप लागली नाही की अन्न गोड लागले नाही.’ आजमितीस त्यांच्या निवासस्थानी ३५०० ते ४००० अतिशय दुर्मिळ ग्रंथ दिमाखाने उभे आहेत. यात बाबासाहेबांनी लिहिलेली , बाबासाहेबांवर इतरांनी लिहिलेली, सत्यशोधक चळवळ, दलित चळवळ, पँथर चळवळ आणि प्रबोधनकार ठाकरे लिखित ग्रंथांचा प्रामुख्याने समावेश आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ हा ग्रंथ १ ९ २३ साली लंडनच्या पी.एस. किंग अॅण्ड सन या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला. या ग्रंथाचा पहिल्या आवृत्तीसोबतच ‘हू वेअर शुद्राज’, ‘इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया’, ‘अॅनहिलेशन ऑफ कास्ट’ त्यांच्या संग्रही आहेत. डॉ. आंबेडकरांचे चरित्रकार धनंजय कीर, चां.भ. खैरमोडे, डॉ. य. दि. फडके, डॉ. भालचंद्र फडके, डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे , लता मुरुगकर, रोझप्लिन ओ हॅन लॉन (इंग्लंड ), तटोरो मोमुदा (जपान ) , डॉ. अनुपमा राव ( कोलंबिया विद्यापीठ अमेरिका ) आणि भावना भार्गव इत्यादींनी त्यांच्या संग्रहालयाला भेट देऊन त्यांच्याकडून संदर्भ घेतले. सोबतच सर्व प्रकारच्या आंबेडकरप्रेमी संशोधकांना त्यांनी मनापासून सहकार्य केले. कुणाकडूनही पैशाची मागणी केली नाही. बाबासाहेबांच्या कार्याचा आणि विचारांचा लोक अभ्यास करतात याचे त्यांना मनस्वी समाधान आहे. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया गोरेगाव शाखा सरचिटणीस (१९६१), ‘भीमस्मृती’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विशेषांक संपादन (१९६६) , ‘पूर्णाहूती’, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मृती विशेषांक संपादन (१९७२), ‘लोकराज्य’ कर्मवीर दादासाहेब गायकवाड विशेषांक महाराष्ट्र राज्य अतिथी संपादक, विशेष कार्यकारी दंडाधिकारी महाराष्ट्र राज्य (१९८२), म. फुले चरित्र साधने समिती महाराष्ट्र राज्य सदस्य, डॉ. आंबेडकर चरित्र साधने समिती महाराष्ट्र राज्य सदस्य (१९९२) अशी प्रतिष्ठित पदे त्यांनी भूषविली. आयुष्याच्या सांध्यसमयीही ते नियमितपणे लिखाण, भाषणे व प्रवचने देऊन समाज प्रबोधनाचे महान कार्य करीत आहेत.
उतारवयातही त्यांची प्रकृती धडधाकट असून डोळ्याला चष्मा नाही, कानाला श्रवणयंत्र नाही, हातात काठी नाही, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेबांच्या पुण्याईने बहरून आले आहे. बोधगयेच्या निरंजना नदीप्रमाणे त्यांची जीवनधारा अफाट वाचन, तल्लख स्मरणशक्ती, खणखणीत आवाज , सुस्पष्ट बोलणे आणि महाराष्ट्रातील नामांकित वृत्तपत्रातून लेखन करणे याची चालती – फिरती प्रयोगशाळाच बनली आहे. आंबेडकरी चळवळीच्या अनेक सत्याग्रहात सहभागी झालेल्या रमेशरावांना त्यागी, निस्वार्थी समाजसेवेबद्दल अनेक पुरस्कारांनी अलंकृत करण्यात आले.
त्यात आंबेडकर युवा समिती आंध्र प्रदेश (१९९८) , मुंबई मराठी लेखक संघ (२०००), दादासाहेब रुपवते समाजभूषण पुरस्कार , डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पुरस्कार, दी बुद्धिस्ट फाउंडेशन सन्मानचिन्ह व पुरस्कार (२०१८) , मृणालताई गोरे स्मृती ज्येष्ठ पुरस्कार आणि डॉ . बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला जालना पुरस्कार (२०१९) आदी प्रमुख आहेत . ‘ग्रंथ माझे वैभव आहे’ असे मोठ्या अभिमानाने म्हणणारे पितृतुल्य रमेश शिंदे वयाच्या ८८ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. दीर्घायुष्यासाठी तथागतचरणी मंगलकामना.
-मिलिंद मानकर, नागपूर
मो. 80803 35096




